Farmers’ Protest Updates: चर्चेची 8वी फेरीही ‘निष्फळ’; जाणून घ्या बैठकीत काय झाले

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या तीन कृषी विषयक कायद्यांच्या विरोधात दिल्लीत धरणे धरून बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संबंधात सरकार बरोबर आज चर्चेची आठवी फेरी झाली. परंतु या चर्चेतही दोन्ही बाजू आपापल्या पुर्वीच्याच भूमिकांवर ठाम राहिल्याने कोणताच तोडगा निघू शकला नाही.

चर्चेची पुढील फेरी आता 15 जानेवारीला होण्याची शक्‍यता आहे. तुम्ही कायदा वापसी करा आम्ही घर वापसी करतो असे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी सरकारला सांगितले; पण सरकारने हे कायदे रद्द केले जाण्याची शक्‍यता साफ फेटाळून लावली.

आजच्या बैठकीत फार काळ चर्चा झाली नाही. या प्रकरणात सुप्रिम कोर्टात 11 जानेवारीला सुनावणी होणार आहे, ती लक्षात घेऊन चर्चेची पुढची फेरी 15 जानेवारीला ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

आजच्या बैठकीत सरकारने अशी भूमिका घेतली की सरकारने केलेल्या या कायद्यांचे देशातील बहुतांशी शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी देशाच्या अन्य भागातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आणि व्यापक देश हित लक्षात घेऊन हे आंदोलन मागे घ्यावे.

या बैठकीतही कृषी मंत्री तोमर यांनी कायद्यातील तरतूदींविषयी आपण चर्चा करू असे शेतकऱ्यांना सांगितले पण शेतकरी प्रतिनिधींनी हे कायदेच रद्द करा अशी आपली भूमिका कायम ठेवली. तुम लॉ वापसी करो हम घर वापसी करेंगे असे या प्रतिनिधींनी सरकारला सांगितले. कृषी हा राज्य सरकारचा विषय आहे आणि ही बाब सर्वोच्च न्यायालयानेही अनेक खटल्यांमध्ये स्पष्ट केली आहे.

त्यामुळे केंद्र सरकारने असे कायदे करणे वैध ठरत नाहीं असे शेतकरी प्रतिनिधींनी सरकारच्या लक्षात आणून दिले. तुम्हाला हा पेच सोडवण्याची इच्छा नसेल तर आम्हाला तसे स्पष्ट सांगा विनाकारण वेळ का वाया घालवायचा असेही एका शेतकरी नेत्यांने यावेळी संबंधीत मंत्र्यांना सुनावले.

शेतकरी समन्वय समितीच्या सदस्य कविता कुरूगंती यांनी पत्रकारांना सांगितले की हे कायदे रद्द केले, जाणार नाहीत असे सरकारने आज पुन्हा स्पष्टपणे सांगितले आहे. ही बैठक सुमारे तासभर चालली. बैठकीच्या मध्ये केंद्राचे प्रतिनिधी असलेले तीन मंत्री आपसात चर्चा करण्यासाठी काही काळ बाहेर गेले पण तो पर्यंत शेतकरी प्रतिनिधी तेथेच बसून राहिले होते.

त्यावेळी त्यांनी हातात जितेंगे या मरेंगे अशी घोषणा देणारा फलक धारण केला होता. आजच्या बैठकीच्यावेळी लंच ब्रेक घेण्यासही शेतकरी प्रतिनिधींनी नकार दिला. या बैठकीच्या आधी कृषी मंत्री तोमर यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.