कांदा निर्यात बंदीला शेतकऱ्यांचा विरोध

निर्णय मागे घेण्याची मागणी : मार्केट यार्डात सरकारविरोधी घोषणा देत निषेध

पुणे – वाढते भाव नियंत्रित ठेवण्यासाठी कांदा निर्यात बंदीचा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. हा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी मार्केट यार्डात सोमवारी (दि. 30) शेतकऱ्यांनी सरकारविरोधी घोषणा देत निषेध नोंदवला. तसेच, शेतकरी मालाला हमी भाव देण्याची मागणीही केली.

गेल्या काही दिवसांत कांद्याची मागणी वाढली आहे. तर आवक कमी होत आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकरी कमालीचे नाराज झाले आहेत. यावेळी संतोष नांगरे, परशुराम गोळे, गोविंद चव्हाण, नवनाथ शितोळे, भानुदास जगदाळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

मागील 4 वर्षांच्या तुलनेने यावर्षी देशात कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत कांद्याचे भाव वाढले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर केंद्र शासनाने निर्यात बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यभरातून कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी पुणे बाजार समितीत सरकारविरोधी घोषणा देऊन या निर्णयाचा निषेध नोंदवला. तसेच, राज्याचे पणन संचालक यांना याबाबत निवेदन दिले. कांदा लागवड, औषधे, काढणी, बाजारात घेऊन येईपर्यंत त्यावर मोठा खर्च होत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीत घेतलेला निर्णय ताबडतोब रद्द करण्यात यावा, तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.