जंतरमंतरवर आजपासून “शेतकरी संसद’

राकेश टिकैत दोनशे शेतकऱ्यांसह दिल्ली दाखल

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांविरूध्द छातीला माती लावून मैदानात उतरलेले दोनशे शेतकरी देशाची राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. सरकारने सशर्त परवानगी दिल्यामुळे शेतकऱ्यांचा जत्था कृषी कायद्याविरूध्द संसदेजवळ उद्यापासून 9 आगस्टपर्यंत आंदोलन करणार आहे.

भारतीय किसान युनियनचे प्रमुख राकेश टिकैत दोनशे शेतकऱ्यांसह जंतरमंतरवर दाखल झाले आहेत. केंद्राच्या कृषी कायद्याविरूध्द संसदेजवळ आंदोलन करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. मात्र, सरकारने परवानगी नाकारल्यामुळे ते दिल्लीच्या बॉर्डरवर ठिय्या मांडून बसले होते.

मात्र, आता दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शेतकऱ्यांना दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करण्याची सशर्त परवानगी दिली आहे. राकेश टिकैत यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेजवळ “शेतकरी संसद’ भरविण्याची घोषणा केली होती. सरकारची परवानगी मिळाल्यामुळे शेतकरी उद्यापासून 9 आगस्टपर्यंत जंतरमंतरवर आंदोलन करू शकतील. 26 जानेवारी रोजी दिल्लीत उसळलेल्या हिंसेनंतर केंद्राने शेतकऱ्यांना दिल्लीत शिरण्याची परवानगी दिली आहे, हे येथे उल्लेखनीय.

शेतकऱ्यांना सायंकाळ पाच वाजेपर्यंत आंदोलन करण्याची मुभा देण्यात आली आहे. दिल्लीत एकीकडे देशाची संसद चालणार आहे. तर दुसरीकडे जंतर मंतरवर शेतकऱ्यांची “शेतकरी संसद’ बघायला मिळणार आहे.

शेतकऱ्यांचा हा जत्था सिंधू बॉर्डरवरून बसव्दारे जंतरमंतरवर पोहचला आहे. शेतकरी संसदेतील कार्यवाहीवर लक्ष ठेवणार असल्याचे टिकैत यांनी सांगितले. त्यामुळे जंतरमंतरवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. परंतु, सरकारने ही मागणी धूडकावून लावली आहे. यामुळे तिन्ही कायदे रद्द होत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलन करणार असल्याचा निश्‍चय शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये 10 पेक्षा जास्त वेळा चर्चा झाली. परंतु, यावर अजूनदेखील काही तोडगा निघालेला नाही. अशात, शेतकरी संसद भरविली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.