विमानतळ नकाशावर शेतकऱ्यांच्या हरकती

खळद -पुरंदर तालुक्‍यातील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय प्रस्तावित विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून अधिसूचित क्षेत्र जाहीर करण्यात आले असून या क्षेत्राचा विकास आराखडा जाहीर केला आहे. त्यानुसार 7 गावांतील विमानतळाच्या हद्दीचे नकाशे जाहीर केले आहेत. त्यावर 1557 शेतकऱ्यांनी हरकती नोंदवल्या असल्याची माहिती नायब तहसीलदार सुहास सोमा यांनी दिली.

कुंभारवळण येथील 146, खानवडी येथील 185, वनपुरी येथील 507, पारगाव येथील 501, उदाचीवाडी येथील 123, एखतपूर येथील 56, मुंजवडी येथील 39 अशा एकूण 1557 हरकती दाखल झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी एकूण 2832 हेक्‍टर क्षेत्र बाधित होणार आहे. या प्रकल्पात सर्वात जास्त क्षेत्र पारगाव येथील 1057 हेक्‍टर जाणार आहे. त्याचबरोबर वनपुरी येथील 339 हेक्‍टर, कुंभारवळण येथील 351 हेक्‍टर, उदाचीवाडी येथील 261 हेक्‍टर, एखतपूर येथील 279 हेक्‍टर, मुंजवडी येथील 143 हेक्‍टर क्षेत्र महाराष्ट्र विकास विमानतळ कंपनीकडून अधिसूचित करण्यात आले आहे.

पुरंदरमधील संभाव्य विमानतळ प्रकल्पबाधित सातही गावातील सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच शेतकऱ्यांना हे विमानतळ नकोच आहे. आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकरी म्हणूनच आम्हाला आमच्या आयुष्य जगायचे आहे. आमचा विरोध डावलून आमच्या बागायती शेत जमिनीवर जबरदस्तीने विमानतळ लादू नये.
– सर्जेराव मेमाने, सरपंच ग्रामपंचायत पारगाव मेमाणे 

Leave A Reply

Your email address will not be published.