कोल्हापूर: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीने दिलेल्या कर्जमाफीवरून टीका केले आहे. त्यांनी आज कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला. आज आपल्या शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. पण राज्य सरकार कर्जमाफीसाठी मार्चपर्यंतची प्रतीक्षा करण्यास सांगते आहे आणि दुसरीकडे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकही रुपया मदत द्यायला तयार नाही. कर्जमाफी जाहीर करताना ती केवळ पीककर्जासाठी असल्याचे फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्या काळात कर्जमाफी दिली गेली, तेव्हा त्यात अल्प आणि मध्यम मुदतीचे कर्ज सुद्धा समाविष्ट करण्यात आले होते. 1.5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आमच्या सरकारनेच माफ केले होते, त्यामुळे या नव्या कर्जमाफीचा फायदा फार शेतकऱ्यांना मिळणार नाही. आपल्या राज्याची आर्थिक स्थिती अन्य राज्यांच्या तुलनेत अतिशय उत्तम आहे. मुद्दाम गैरसमज पसरविले जात आहेत.
नागरिकत्व कायद्याबाबत देखील फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. नागरिकत्व सुधारणा कायदा हा कोणत्याही धर्म किंवा जातीविरुद्ध नाही. हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे, काढून घेण्यासाठी नाही. विरोधी पक्ष मुद्दाम संभ्रमाचे वातावरण तयार करीत आहेत. हे केवळ मतांसाठीचे राजकारण आहे, अशी टीका त्यांनी केली.