शेतकऱ्याची कमाल! शेणापासून प्रदूषणविरहित लाकडाची निर्मिती

शेतकरी किसन टिळेकर यांचा अनोखा दिशादर्शक उपक्रम

– हनुमंत चिकणे

उरुळी कांचन – अंत्यविधी, अग्निहोत्र, होमहवनासह विविध धार्मिक कार्यक्रमात लाकडाची गरज भासते. याचा वापर कमी करण्याच्या हेतूने उरुळी कांचन (ता. हवेली) येथील शेतकरी किसन दशरथ टिळेकर यांनी प्लायवूडचा भुसा, उसाची चिपाडे व शेणापासून विशिष्ट प्रकारचे लाकूड तयार केले आहे. टिळेकर यांनी तयार केलेल्या या लाकडाचा उपयोग गेल्या काही महिन्यांपासून उरुळीकांचन येथील स्मशानभुमीत अंत्यविधीसाठीही केला जात आहे. विशिष्ट प्रकारचे लाकूड बनविण्याचा हा जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील पहिलाच उपक्रम असल्याचा दावा करण्यात आला आहे.

लाकडाचा वापर विविध कारणातून आजही मोठ्या प्रमाणात होत असतो, या गरजेतून वृक्षतोडही मोठ्या प्रमाणात होते. मात्र, काही गावात लाकडाबरोबरच अंत्यविधीसाठी शेणापासून बनविलेल्या गोवऱ्याचा वापर होतो, हे लक्षात आल्याने टिळेकर यांनी विशिष्ट लाकूड बनविण्याची तयारी सुरू केली. पुणे जिल्ह्यात शेतकरी शेतीसह पशूपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. पशूपालनातून दूध आणि शेण व शेणापासून तयार होणाऱ्या खतांतून पैसा शेतकऱ्यांना मिळतो. मात्र, शेणापासून विशिष्ट लाकूड तयार करण्यात यशा आल्याने यातूनही शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे.

गावात गोबर गॅसची संकल्पना आली होती, त्यावेळी बऱ्याच गावात ती राबविण्यातही आली. याच धर्तीवर शेणापासून लाकूड तयार केले जाणार असल्याने शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना उत्पन्नाचा आणखी एक मार्ग उपलब्ध झाला आहे. दरम्यान, लाकुड बनविण्यासाठीच्या मशीनची किंमत 65 ते 70 हजार रुपये आहे. या मशीनच्या साहाय्याने 30 सेंकदात एक लाकूड तयार करु शकतो.

लाकूड तयार करण्यासाठी फर्निचरचा भुसा, शेण, उसाचे अथवा बाजरीची चिपाडे याचा उपयोग केला जातो. यातून सरासरी निव्वळ 30 टक्‍के नफा मिळतो. याचा वापर घरी चुलीसाठी, हॉटेल, वीटभट्टीमध्ये केला जातो. हवेली तालुक्‍यातील तरुणांनी असा उद्योग सुरू केल्यास यातून आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होईल. वृक्षतोड कमी होऊन प्रदूषणावरही नियंत्रण मिळेल. पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल.
– किसन टिळेकर, लाकुड निर्माते, उरुळी कांचन

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.