पुणे – दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील शेतकरी संघटना मुंबईतील अंबानी कॉर्पोरेट हाऊसवर दि. 22 डिसेंबर रोजी मोर्चा काढणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कामगार नेते डॉ. बाबा आढाव, राहुल पोफळे, ऍड. राजेंद्र गोरडे, एस. व्ही. जाधव, प्रतिभा शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनी मागणी केली नसताना कृषी कायदे लादले आहेत. केवळ अदानी आणि अंबानी यांच्या फायद्यासाठी केलेल्या या कायद्यांमुळे शेतकरी देशोधडीला लागेल. दिल्लीतील आंदोलन यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा आहे. यामध्ये राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार जयंत पाटील यांच्यासह विविध संघटनांचे नेते सहभागी होणार आहेत.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयापासून दुपारी दोन वाजता अंबानी कार्पोरेट हाऊसवर मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असणाऱ्या सर्व संघटनांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले.