आ. शिवेंद्रसिंहराजे; 74 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळेमेळीत
सातारा – शेती आणि शेतकरी आहे म्हणून जगाला अन्नधान्य मिळत आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि याच शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा, बी बियाणे, खते आणि औषधे मुबलक प्रमाणात वेळेत उपलब्ध व्हावीत, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करुन त्यांना प्रत्येक बाबतीत सहकार्य व्हावे यासाठी सातारा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासले जात आहे. यापुढेही शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी सातारा तालुका संघ कटीबध्द राहील, अशी ग्वाही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
सातारा तालुका खरेदी विक्री संघाच्या 74 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. याप्रसंगी शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष गणपतराव शिंदे, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सतीश चव्हाण, माजी सदस्य राजू भोसले, विद्यमान सदस्य प्रतीक कदम, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, सदस्य दयानंद उघडे, राहूल शिंदे, विक्रम पवार आदी उपस्थित होते. संघाने 24 कोटी 84 लाख रुपयांची आर्थिक उलाढाल केली असून 1.45 लाख रुपयांचा व्यापारी नफा संघाने नोंदवला आहे. संघाच्या 11 शाखा आणि 100 हून अधिक किरकोळ विक्रेत्यांमार्फत खते, औषधे, बी बियाणे यांचा व्यवसाय करीत शेतकऱ्यांची सेवा अखंडपणे करत आहेत.
या आदर्शवत कार्याबद्दल शिवेंद्रसिंहराजे यांनी संघाचे अध्यक्ष गणपतराव शिंदे आणि सर्व संचालकांचे अभिनंदन केले. तसेच इफको संस्थेने रासायनिक खतांचे दर प्रती बॅगमागे 165 रुपयांनी कमी केल्याबद्दल इफकोचे संदीप रोकडे यांचाही शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कमी केलेले दर शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील असेही ते म्हणाले. पारदर्शी कराभार, अचुक नियोजन याच्या जोरावर सातारा तालुका संघाने चांगली कामगिरी केली असून भविष्यातही शेतकऱ्यांची सेवा अखंडपणे सुरु राहील, असे संघाचे अध्यक्ष शिंदे यावेळी म्हणाले.
सुनिल काटे यांनी स्वागत केले. सुरेंद्र देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. नारायण साळुंखे यांनी आभार मानले. कार्यक्रमास संघाचे व्हा. चेअरमन मेंश जाधव, ऑडिटर इंगवले, यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संघाचे सर्व संचालक, अधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.