पाणी पळविल्याने तळेगाव परिसरातील शेतकरी हवालदिल

संगमनेर  – परतीच्या पावसाने संगमनेर तालुक्‍याला ओलाचिंब झाला असतांना सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या तळेगाव परिसराचा घसा मात्र ओल्या दुष्काळानंतरही कोरडाच आहे. परतीच्या पावसाने तुडूंब झालेल्या भोजापूरमधून मोठ्या प्रतीक्षेनंतर पूरचारीला पाणी सोडले गेले खरे, मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामूळे या पाण्याची पळवापळवी सुरु झाल्याने तळेगाव परिसरातील टेलटॅंकपर्यंत पाणी पोहाचले नाही, परिणामी तळेगाव परिसरासह तिगांव, करुले, कौठे, निळवंडे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नगर जिल्ह्यात पावसाला यंदा मोठ्या प्रतीक्षेनंतर सुरुवात झाली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दमदार कोसळलेल्या पावसाने मोठ्या धरणांसह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व नगर जिल्ह्यातील निमोण – तळेगाव परिसरासाठी वरदान ठरलेले भोजापूर धरणही तुडूंब झाले. त्यामुळे तब्बल चार वर्षांनंतर म्हाळुंगी नदी वाहती झाली.

या दरम्यान निमोण-तळेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलने करीत हक्काचे पाणी मिळविण्यासाठी संघर्ष केला. त्या संघर्षाचे फळ म्हणून भोजापूरच्या पूरचारीतून संगमनेर तालुक्‍याच्या दुष्काळी भागासाठी पाणी सोडण्यात आले. या पाण्यातून ठिकठिकाणचे साठवण तलाव, छोटे बंधारे, गावतळी भरुन घेण्याचेही नियोजन करण्यात आले होते.

त्यासाठी भोजापूरच्या पूरचारीतून गेल्या अडीच महिन्यापासून पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्यातून निमोण-पिंपळे परिसरातील गावतळी भरल्यानंतर टेलचा करुले येथील साठवण तलाव भरणे अपेक्षित होते.मात्र वरच्या भागातील तळी, बंधारे व तलाव भरल्यानंतर त्या भागातील शेतकऱ्यांनी अतिरिक्त पाण्याच्या लालसेने परस्पर चारी फोडून पाणी पळविण्याचे प्रकार घडू लागल्याने तळेगाव परिसरातील शेतकऱ्यांपासून भोजापूरचे पाणी अद्यापही दूरच आहे. या परिसरातील काही शेतकऱ्यांनी वरच्या भागात जावून पाहणी केली असता पाणी पळविले जात असल्याचा प्रकार त्यांना दिसला.

गेल्या अडीच महिन्यांपासून पूरचारीला पाणी सोडूनही हे पाणी अद्यापही तळेगाव परिसरात न पोहोचल्याने तळेगाव परिसरासह तिगांव, करुले, कौठे, निळवंडे भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. विशेष म्हणजे या चारीतून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असतांना आणि काही जणांकडून चारी फोडतांना चारीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात असतांना पाटबंधारे विभागाचा कोणताही अधिकारी वा कर्मचारी या परिसरात फिरकला नसल्याने पाणी पळवण्याच्या प्रकारात वाढच होत आहे.

पाणी चोरी रोखून पूरचारीचे नुकसान करणाऱ्या व पाणी पळविणाऱ्यांवर कारवाई करावी व आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळावे, अशी मागणी सुनील उर्कीडे, तळेगावचे सरपंच बाबासाहेब कांदळकर, सचिन दिघे यांच्यासह तळेगाव परिसरातील शेतकरी, सर्व संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here