बारामती : बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनात माती विना शेतीचे प्रयोग, व्हर्टिकल फार्मिंग, परदेशी फळ पिके, एक खोड डाळिंब, पेरू, शेवगा, परदेशी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान पाहून शेतकरी हरखून गेले होते.
कृषी प्रदर्शनाच्या तिसर्या दिवशी शनिवारी (दि. 18) राज्यतील विविध जिल्ह्यातून तसेच कनार्टक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, गोवा राज्यातील शेतकर्यांनी गर्दी केली होती. पशुप्रदर्शनाचे स्वतंत्र दालन असलेल्या या प्रदर्शनात देशी, विदेशी श्वानांचे स्पर्धेमध्ये यामध्ये इंडियन ब्रीड, टॉय ब्रीड यांचा समावेश होता. पशूंच्या स्पर्धेमध्ये कालवड स्पर्धा, खिलार वळू, लाल खंदारी वळू, गायी यांचा सहभाग होता.या स्पर्धेचे पंच क्रांतिसिंह नाना पाटील पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग होते. या स्पर्धेचा निकाल सोमवरी (दि. 20) जाहीर केला जाणार आहे.
प्रदर्शनात कृषि विज्ञान केंद्रामार्फत आयोजित केल्या जाणार्या विविध प्रशिक्षणासाठी शेतकर्यांनी माहिती घेतली व नाव नोंदणी केली. तसेच पिकांच्या विविध वाणांची माहिती घेण्यासाठी शेतकरी कंपन्यांच्या स्टॉलला गर्दी करताना दिसून आले. कृषी प्रदर्शन सोमवार (दि. 20) पर्यंत सुरु रहाणार असून शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. निलेश नलावडे यांच्यातर्फे करण्यात आले.
दीड टनांचा रेडा आकर्षणाचा केंद्रबिंदू
दूध देणार्या संकरीत गायींची दुधाची स्पर्धा रविवार (दि. 19) पर्यंत सुरु रहाणार आहे. पशु प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरलेला शिंदे डेअरीचा दीड टनांचा रेडा, बन्नुर जातीच्या कनार्टक राज्यातील मेंढ्या शेतकरी आवर्जून पाहत होते.
मी या प्रदर्शनामध्ये पहिल्यांदाच आलो असून कृषिक मधील पशु दालन, कृत्रिम बुद्धिमत्ता प्लॉट व प्रदर्शनाचा दर्जा उत्तम आहे.
– सोपान गव्हाणे, वाघोली (ता. धारूर, जि. बीड )
मी या पूर्वी दोन वेळेला प्रदर्शनाला भेट असून या वेळेस प्रदर्शानामधील मस्त्यपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन आवडले. सर्व नियोजन चांगले केले आहे.
– प्रदीप गडदे, (मोहनडे, ता. जिंतूर जि. परभणी)
प्रदर्शनामधील उती संवर्धन विषयातील माहिती आवडली. एकूण प्रदर्शन दर्जा उत्तम आहे तसेच प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे कृषी तंत्रज्ञान पहायला मिळाले.
– ओमकार शिंगार, वाळवा (जि. सांगली)