Farmers News : एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना दुसरीकडे केंद्र सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नुकतेच केंद्र सरकारने उकडा तांदळाच्या निर्यातीवरील १० टक्के शुल्क शून्य केले. तसेच बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर ४९० डॉलर प्रति टन निर्यात शुल्क देखील हटवण्याचा निर्णय घेतला.
परकीय व्यापार महासंचालनालयानेजारी केलेल्या अधिसूचनेनुसार, गैर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीसाठी एमइपीची आवश्यकता तात्काळ प्रभावाने काढून टाकण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात २८ सप्टेंबरला सरकारने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या परदेशी मालावरील संपूर्ण बंदी उठवली होती. किमान निर्यात किंमत एमइपी लागू केली होती. देशातील सरकारी गोदामांमध्ये तांदळाचा पुरेसा साठा असताना आणि किरकोळ किमतीही नियंत्रणात असताना सरकारने हा निर्णय घेतला.
बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यात मालावरील किमान निर्यात किंमत काढून टाकूनही शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच जास्तीत जास्त तांदूळ विकला जावून त्यातून चांगला आर्थिक फायदा शेतकऱ्यांना होईल.
तसेच भारतीय कंपन्या त्यांच्या किमतीनुसार परदेशात बिगर बासमती पांढरा तांदूळ विकू शकतील. या तांदळावरील किमान निर्यात किंमत काढून टाकण्यापूर्वी कंपनीला निश्चित किंमतीपेक्षा कमी दराने तांदूळ निर्यात करण्याची परवानगी नव्हती. पण आता असे होणार नाही.
दरम्यान, किमान निर्यात किंमत काढून टाकण्यापूर्वी, बिगर बासमती पांढरा तांदूळ मालदीव, मॉरिशस, संयुक्त अरब अमिराती आणि आफ्रिका या मित्र देशांना निर्यात करण्याची परवानगी होती. आतापासून कंपन्या वाजवी किमतीत त्यांचे माल इतर देशांमध्ये निर्यात करू शकणार आहेत.