पशुधन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची वणवण

दुष्काळाच्या झळा, चारा-पाण्यासाठी भटकंती

राज्यात जवळपास तीस हजार गावांमध्ये भीषण दुष्काळाचे सावट पसरलेले आहे. थेंबथेंब पाण्याच्या शोधासाठी कोसोमैल शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. दुष्काळाची झळ बसलेल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जगायचे कसे? हा मोठा प्रश्‍न त्यांच्यापुढे पडला आहे. त्याचबरोबर शेती व्यवसायाला अखंड साथ देणाऱ्या पशुधनाचे करायचे काय? असे अनेक प्रश्‍न त्यांच्यापुढे उभे आहेत. दुष्काळग्रस्ताबाबत शासनाचे “बोलाचा भात, बोलाचीच कडी’ असे धोरण राहिले असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.

सातारा – सातारा जिल्ह्यातील काही भागात पडलेला भीषण दुष्काळाची झळ आता शेतकरी बांधवांबरोबरच जिवापाड जपलेल्या जनावरांनाही बसत आहे. गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या यांना चारापाणी मिळत नसल्याने पशुधनाचे करायचे काय असा प्रश्‍न शेतकरी बांधवापुढे पडला आहे. दुष्काळग्रस्त खटाव, माण, दहिवडी, कोरेगांव, म्हसवड, फलटण, खंडाळाबरोबरच जावली व परळी भागातील शेतकरी बांधव शासन मदतीच्या अपेक्षित आहे. सध्या चारापाण्याविना जनावरे तडफडत असून शेतकरी बांधव या समस्येपुढे हतबल झाला आहे. हजारो जनावरे दुष्काळात होरपळून निघत आहेत. पशुधन वाचविणे यासाठी शेतकरी बांधवाची धावपळ सुरु आहे.

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगांव, खंडाळा भागावर भीषण दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यामुळे येथील शेतकरी बांधव व नागरिक मेटाकुटीला आले आहेत. जगायचे कसे हा त्यांच्या पुढे मोठा प्रश्‍न पडलेला असताना जीवापाड जोपासलेले पशुधनाचे करायचे काय या विवेचनेत सापडलेला शेतकरी बांधव परिस्थितीपुढे हतबल झाला आहे. निसर्गाचा वाऱ्यावर होणाऱ्या कोपामुळे शेतकरी बांधवांची मात्र कोंडी झाली आहे. जमीन आहे पण पाणी नाही. अशा विचित्र परिस्थितीतही शेतकरीबांधव मात्र आशेवर जगत आहे. मागील तीनचार वर्षापासून सततच्या पडणाऱ्या भीषण दुष्काळामुळे भूजलातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे.

ओढेनाले, तलाव कोरडे पडल्याने पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. खटाव, माण, दहिवडी, कोरेगांव, म्हसवड, फलटण, खंडाळाबरोबरच जावली व परळी भागातील शेतकऱ्यापुढे अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. विशेषतः पशुधन वाचविण्यासाठी या शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. जनावरांना चारापाणी प्राप्तीसाठी कोसोमैल दूर शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने जनावराना हिरवा चारा मिळणे कठिण झाले आहे. सध्या लोकसभेच्या निवडणुकीत राजकिय नेते हे दंग झाल्यामुळे दुष्काळाकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष झाले आहे.

दिवसेंदिवस ही परिस्थिती गंभीर होत चालल्याने अनेकजण स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसून येत आहे. तर अनेक ठिकाणी तरुण मुले हे उदरनिर्वाहासाठी शहराकडे कुच करीत आहेत. ही ग्रामीण भागातील विदारक परिस्थिती निर्माण होवू लागली आहे. दुष्काळात होरपळून जात असलेल्या या शेतकरी बंधूकडे शासनाचा कानाडोळा झाला आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीचे निमित करून अधिकारी वर्ग ही सैराट झाला आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे पाहिले जाते. सध्या शेती हा व्यवसाय अडचणीत आला आहे. दुष्काळामुळे तर तो कोमातच गेला आहे. ओला, सुका दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकरी बांधवांना पशुधनाचा काय तो आधार होता; परंतु सध्या या पशुंना दुष्काळामुळे चारापाणी मिळत नसल्याने शेतकरी बांधव पूर्णपणे कोसळला आहे.

श्रीरंग काटेकर,सातारा

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.