कर्नाल सचिवालयाबाहेर शेतकऱ्यांचा ठिय्या सुरूच

शेतकरी आंदोलनाचे देशातील दुसरे केंद्र बनू पहात आहे कर्नाल

कर्नाल – शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबीत करावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हरियाणातील कर्नाल येथील मिनी सचिवालयाला घेराव घातला असून काल रात्रीपासून हे शेतकरी तेथे बसून आहेत. आपल्या मागणीची पुर्तता होईपर्यंत तेथून हटणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

सनदी अधिकारी आयुष सिन्हा यांनी शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करून त्यांची डोकी फोडण्याचा जो आदेश दिला होता त्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. काल शेतकऱ्यांनी मिनी सचिवालयावर मोर्चाचे व महापंचायतीचे आयोजन केले होते. त्यांचे हे आंदोलन हाणून पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश दिला होता. तसेच शेतकऱ्यांना पाण्याचे फवारे मारून तेथून हुसकाऊन लावण्याचाही प्रयत्न केला गेला होता. परंतु शेतकऱ्यांनी निर्धाराने हा सारा प्रतिबंध मोडून काढून जिल्हा मुख्यालयाच्या बाहेर आपला ठिय्या दिला आहे.

कर्नाल येथे 28 ऑगस्टला शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करण्याचा प्रकार घडला होता. त्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. अन्य दहा जण जखमी झाले आहेत. आमची मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर आता दिल्ली नंतरचे शेतकरी आंदोलनाचे हे एक महत्वाचे केंद्र बनले आहे.

संयुक्त किसान मोर्चाच्या मुज्जफरनगर येथील महापंचायतीनंतर शेतकऱ्यांनी आपला मोर्चा थेट कर्नालला वळवला आहे. त्या ठिकाणी स्वता राकेश टिकैत आणि योगेंद्र यादव हेही पोहचले आहेत. दिल्ली बॉर्डरप्रमाणेच येथेही शेतकऱ्यांनी लंगर लाऊन जेवणाखाण्याचीही व्यवस्था सुरू केली आहे. शेतकरी रस्त्यावरच झोपत आहेत. त्यामुळे हरियाना सरकारपुढे एक नवी आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.