अनुदान मिळत नसल्याने ठिबककडे शेतकऱ्यांची पाठ

सणबूर – पाटण तालुक्‍यातील कृषी विभागाच्या उदासीन कारभारामुळे ठिबक योजनेकडे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. कृषी विभागामार्फत ठिंबक योजनेची जनजागृती केली जात नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे ठिबक साहित्य पडून राहिले आहे. तर गतवर्षी फुंडकर योजनेतून आंबा लागवड केलेल्या अनेक शेतकऱ्यांना अजुनही ठिबकचे अनुदान मिळाले नसल्यामुळे त्यांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे.

ठिंबक योजनेचे फायदे अनेक असले तरी ठिंबक केलेल्या शेतऱ्यांना शासकीय अनुदानाची वाटप पहावी लागत आहे. ठिंबकची योजना केलेल्या शेतात सध्या उंदरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उंदरांकडून पाईप खाल्ल्या जात असल्यामुळे ठिबक घेणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे दिसते. ठिबक पद्धतीमुळे पाणी शेतात मुरण्यास वेळ लागत असल्याने अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्याउलट पाट पाण्याने पिकांना पाणी पाजल्यास बरेच दिवस शेतात गारवा राहतो, असे शेतकरी सांगत आहेत. शासनामार्फत ठिंबकसह अनेक प्रकारच्या कृषी योजना राबविल्या जातात. मात्र त्यासाठी भरमसाठ कागदपत्रे, अनेकवेळा हेलपाटे मारावे लागत आहेत. तसेच स्वत:च्या खिशातील पैसे घालून अनुदानाची वाट पहात बसावे लागत असल्यामुळे शेतकरी वर्गातून ठिंबकसारख्या योजनांबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

सध्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे तात्काळ पैसे खात्यावर जमा होतात असे सांगितले जात असलेतरी प्रत्यक्षात मात्र पैसे जमा होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनुदान येण्यास वेळ लागत असल्यामुळे शेतकरी कृषी योजना घेण्यास निरुत्साही असल्याचे चित्र ग्रामीण भागातून दिसत आहे.चालूवर्षी मुबलक पाऊस झाल्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होणार नाही. मात्र, जनजागृती व अनुदान जमा केले जात नसल्यामुळे शेतकरी ठिबक योजनेकडे पाठ फिरवित आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.