पशुधनाच्या वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल

– रामकुमार आगरवाल

देहूरोड – मावळसह पंचक्रोशी परिसरात शेतीबरोबरच कोंबड्या, मेंढरे, शेळ्या, गाई, म्हशी असे पशुधन पालन व्यवसाय शेतकऱ्यांबरोबरच अन्य नागरिकही करीत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पंचक्रोशीतून जनावरे चोऱ्या होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून, नेमकी कोणती टोळी पशुधनाची चोरी करीत आहे?, या चोऱ्यांमागे कोणते रॅकेट तर सक्रिय नाही ना, असा प्रश्‍न पशुपालक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे वाढत्या पशुधनाच्या चोऱ्यांमुळे स्थानिक शेतकरी हवालदिल झाला आहे.

देहूरोड परिसरातील अवैध कत्तलखान्याचा आणि विश्‍व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने पकडण्यात येणाऱ्या गोमांसचा मुद्दा चर्चेत असताना आता पशुधनाच्या वाढत्या चोऱ्यांमुळे जनावरे कत्तलखान्यात तर नाही ना जात, अशी भीती आता पशुपालक शेतकऱ्यांकडून व्यक्‍त केली जात आहे. तसेच या पशुधनाच्या चोऱ्या रोखण्याची मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये बैल, गाई, म्हशी हे त्यांची पशुधन आणि शेतीला जोड धंदा म्हणून कोंबड्या, मेंढ्या, बकऱ्या पालन करण्याकडे शेतकऱ्यांचा कलच नव्हे तर शेतकऱ्यांना आज हेच पशुपालन जगविण्याचे काम करतात.

सेंद्रिय, जैविक खत आणि दुधाला असलेली वाढती मागणी यामुळे शेतकऱ्यांबरोबरच अन्य नागरिकही आता पशुपालन करू लागला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या दारातून, गोठ्यातून, शेतात चरत असणारी बैल, गाई, म्हशी, पारडी, वासरे आदी जनावरे चोरीला जात असल्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

काळोखे मळा, हगवणे मळा, झेंडेमळा, चिंचोली, किन्हई, मामुर्डी, शेलारवाडी, कोटेश्‍वरवाडी, कान्हेवाडी, सांगुर्डी, येलवाडी, सुदुंबरे, शिंदे वासुलीगाव आदी गाव परिसरातील दुभत्या गाई, बैल, वासरे चोऱ्या गेल्याची अनेक तक्रारी आहेत.

देहूरोड शंकर मंदिर परिसरातील मयूर दांगट यांच्या गोठ्यातून सहा महिन्यांपूर्वी बैल चोरीला गेला होता. यासंदर्भात बैलाच्या फोटोसह चोरीला गेल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने दोन दिवसांनी अल्पवयीन मुलासह दोघेजण बैल विक्रीसाठी घेऊन जात असताना पुणे-मुंबई मार्गावर देहूरोड येथील आयुध निर्माणी कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ आढळून आला. त्यांचे बंधू शिवरंजन दांगट यांचे दोन महिन्यांपूर्वी गाय चोरीला गेली आहे. यासंदर्भात पोलिसात तक्रार देण्यात गेले असता जनावराची छायाचित्र, विमा आहे का ? जनावरे सांभाळता येत नाहीत का? अशा आदी विविध प्रश्‍नांच्या भडिमार झाल्याने तक्रार न दिलेली बरी असे म्हणत त्यांनी तक्रार देण्याचा विषय सोडून दिला.

लष्करी भागात असणाऱ्या काळोखे मळा, हगवणे मळा, झेंडेमळा, किन्हई, चिंचोली परिसरात पशुधन चोरीचे प्रमाण मध्यंतरी कमी झाले होते. मात्र, आता याच भागात पशुधनाच्या चोऱ्यांचे प्रमाण पुन्हा वाढत आहे. गेल्या वर्षभरात सुमारे 80 ते 90 जनावरे चोरीला गेल्याच्या तक्रारी येत आहेत. पोलिसांच्या प्रश्‍नांचा भडीमार आणि तक्रार दाखल करून घेण्याची अनास्था यामुळे आम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल करीत नसल्याचे व नाव न छापण्याच्या अटीवर काही पशुपालक शेतकऱ्यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले.

राज्यात गो-हत्या बंदी कायदा असला तरीही जनावरांच्या होणाऱ्या चोऱ्या, दिवसंदिवस कमी होणारे प्रमाण तसेच गायब होणारी जनावरे यांची कत्तल तर होत नाही ना, हा प्रश्‍न निर्माण होत आहे. पंचक्रोशितून गायब किंवा चोरी होणारी जनावरे नेमकी कुठे जातात, त्यांची कोणत्या कत्तलखान्यात विल्हेवाट लावली जातात हा एकमेव प्रश्‍न सध्या पंचक्रोशीत चर्चेला जात आहे. त्याचबरोबर वाढत्या जनावरांच्या चोऱ्या व अवैध कत्तलखाने यामुळे भविष्यात चित्रांमध्ये जनावरे पाहावे लागतील. त्यामुळे जनावरे नामशेष होण्यापूर्वीच शासनाने याची दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांबरोबरच बैलगाडा शौकीन बैले सांभाळत आहेत. गाव परिसरात होणाऱ्या उत्सव यात्रेतील बैलगाडा शर्यतीवर निर्बंध आल्याने बैलगाडा शौकीन बैले सांभाळण्याचे प्रमाण संपुष्टात येत आहे.
– भीमराव चव्हाण, बैलगाडा मालक.


सध्या मांसाहाराचे प्रमाण वाढत असल्याने अधिकृत-अनधिकृत कत्तलखाने ही वाढत आहेत. त्यामुळे रात्री-अपरात्री, भरदिवसा जनावरांच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. पोलीस प्रशासनासह सजग नागरिकांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. गाई, म्हशी, कोंबड्या, पशुधन पालन झाले पाहिजे. त्यामुळे शेती, सेंद्रिय व जैविक खतांबरोबर दुग्ध व्यवसाय वाढेल.
– संदेश भेगडे, अमित भेगडे, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल


वाढत्या औद्योगिकरणाने गावातील शेतकऱ्यांकडे ही पाळीव जनावरांचे प्रमाण कमी झाले असून, त्यामध्ये जनावरे चोरीचे प्रमाणही वाढले आहे, त्यामुळे कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांची तपासणी करण्यात यावी. धष्टपुष्ट, सुदृढ असणाऱ्या जनावरांना ताब्यात घेऊन, पशुधन पालन करणाऱ्या व्यक्तींना सुपूर्द करण्यात यावे. शासनाने याकडे विशेष बाब म्हणून लक्ष केंद्रीत करावे.
– सुनील हगवणे, शिवसेना शहर प्रमुख, श्रीक्षेत्र देहू.


देहूरोड परिसरातील शेतकऱ्यांचे गाई आणि बैल चोरी होण्याचे प्रमाण वाढत असल्याची बाब चिंताकजनक आहे. त्याचबरोबर चोरीला जाणारी जनावरे नेमकी कुठे जातात. त्याची कत्तल केली जाते का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलांना सध्या नोकऱ्या नाहीत.ती बेरोजगार मराठी मुले पशुपालन करून कुटुंबाला हातभार लावत आहेत. अशा वेळी त्यांची दुभती गाई किंवा बैल चोरी होत असेल तर त्यांनी करायचे तरी काय. यापुढे असले प्रकार थांबले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.
– मोझेस दास, उपाध्यक्ष, मावळ तालुका मनसे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.