नवी दिल्ली – इतर काही क्षेत्रांना लॉकडाऊनच्या काळात कर्जाचा हप्ता न दिल्यास चक्रवाढव्याज माफ करण्यात आले असले तरी पीक कर्ज आणि ट्रॅक्टरसाठी घेतलेल्या कर्जाला ही सवलत लागू नसल्याचे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
याबाबत निर्माण झालेली संदिग्धता दूर करण्यासाठी अर्थमंत्रालयाने कालपासून विविध बाबी स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार क्रेडिट कार्डवरील थकबाकी या योजनेसाठी पात्र आहे. यासंदर्भातील चक्रवाढव्याजाच्या मूल्यांकनाबाबत अर्थमंत्रालयाने म्हटले आहे की, क्रेडिट कार्ड मंजूर करणारे यासंदर्भात निर्णय घेतील.
आठ क्षेत्रांना चक्रवाढव्याज माफी
लघुउद्योगासाठी घेतलेले कर्ज, शिक्षण, घर, वाहन इत्यादीसाठी घेतलेले कर्ज, ग्राहकोपयोगी वस्तूसाठी घेतलेले कर्ज, क्रेडिट कार्डवरील थकबाकी आणि वैयक्तिक कर्ज या योजनेसाठी पात्र आहेत. बॅंकांबरोबरच बिगर बॅकिंग वित्तसंस्थांनी दिलेल्या कर्जावर ही सवलत लागू आहे. ही सवलत दोन कोटी रुपयांपर्यंतच्या करण्यासाठी लागू आहे. मात्र, 29 फेब्रुवारी 2020 रोजी या कर्जाचा हप्ता वेळेवर भरला गेला असला पाहिजे.
रिझर्व्ह बॅंकेने या योजनेसाठी पात्र असलेल्या ग्राहकांच्या खात्यामध्ये 5 नोव्हेंबरच्या अगोदर व्याजावर व्याज जमा करण्यास सांगितले आहे. बॅंकांना नंतर ही रक्कम केंद्र सरकार देणार असून यासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे समजले जाते.
लॉकडाऊनमुळे 1 मार्च ते 31 ऑगस्ट 2020 या सहा महिन्यांच्या काळात म्हणजे 184 दिवसांत रिझर्व्ह बॅंकेने कर्ज घेतलेल्या ग्राहकांना हप्ता न भरण्याची सवलत दिलेली आहे. या कालावधीत ज्यांनी हप्ते भरले आहेत किंवा काही हप्ते भरले आहेत, अशा सर्वांना या योजनेचा लाभ होणार आहे.