शेतकरी संकटात त्रस्त, बांधावरील नौटंकीत राज्यकर्ते मस्त

बावडा – गेल्या काही वर्षांपासून इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी कोरड्या दुष्काळाने त्रस्त झाला होता. त्यावेळी पाण्यासाठी राजकारण सुरू होते. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने हाहाकार माजविला आहे. सगळीकडे पाणीच पाणी झाल्याने जे होते. तेही गेल्यामुळे शेतकऱ्यांची “तेलही गेलं आणि तूपही गेलं’ अशी अवस्था झाली आहे. परंतु राजकारणी मंडळी मात्र फक्‍त पाहणी करून आपल्यालाच शेतकऱ्यांचा कळवळा किती आहे, हे दाखवून देण्यात मस्त आहेत.

इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पावसाच्या कमतरतेमुळे पाण्यासाठी टाहो फोडीत होता. पण कुण्या नेत्याला त्याची दया येत नव्हती. तेव्हा मात्र, मीच पाणी देऊ शकतो. तुम्ही मला साथ द्या, अशी प्रत्येक नेत्याची हाक होती. मात्र, खरेखुरे पाणी कुणीच तालुक्‍याला दिले नाही. पाणी पाणी करून शेतकरी बेहाल झाले, पाण्याविना शेती लयाला गेली, जनावरे फुकापासरी विकावी लागली, शेतकरी पुरता आर्थिक खड्ड्यात गाडला गेला. त्याला वर काढायची इच्छा सोडा, पण याचेही राज्यकर्त्यांनी सोयीनुसार राजकारणच केले. इंदापूर तालुक्‍यात अवकाळी पावसाने हाहाकार माजविला असताना राजकारणी मंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना फुकटचे आश्‍वासने देऊन परत येतात. परंतु नुसते आश्‍वासन दिल्याने शेतकऱ्याचे पोट भरेल का? हे बघितले जात नाही.

बळीराजावर डबल दुष्काळाने होरपळला : बांधावर भेटण्यापेक्षा प्रत्यक्ष मदतीची प्रतीक्षा

खरं तर निवडणुकीच्या काळात मतांसाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करतात. पण ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर निवडणुका जिंकता. त्यांना मात्र, मदतीच्यावेळी सरकारकडे पाठपुरावा करून मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन देत निघून जातात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकरी सोसतोय मरण यातना

शेतकऱ्यांच्या जीवावर अगदी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका लढवल्या जातात. त्या शेतकऱ्यांनाही मंडळी पदरमोड करून मदत का देऊ शकत नाहीत? हा प्रश्‍न अनेक शेतकऱ्यांना पडतो. शेतकरी ही गोष्ट उघडपणे बोलत नाहीत, हे वास्तव असले तरी ते दबक्‍या आवाजात मात्र नक्‍की कुजबुजत आहेत.गेल्या पाच ते सहा वर्षांपासून इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी संकटात सापडला आहे. पण त्यांच्या मदतीला धावून यायला मात्र कोणीही तयार नाही. उठसूठ प्रत्येकजण सरकारकडे बोट दाखवून मोकळा होत आहे. शेतकरी आतल्या आत दम घुटमळून मरणयातना सोसताना या लोकांना राजकारण सुचते, अशी खंत बळीराजाने व्यक्‍त केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)