पुणे – नाफेडकडून पुण्यासह राज्यातील पाच जिल्ह्यांत कांदा खरेदीला सुरुवात करण्यात आली आह. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांची अडचण समजून घेत राज्यभरातील 10 लाख मेट्रिक टन कांदा 20 रुपये प्रति किलो या भावाने खरेदी करावा, अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना केंद्र व राज्य सरकारविरोधात मोठे आंदोलन उभे करेल, असा इशारा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सरकारला दिला आहे.
नाफेडच्या कांदा खरेदीत सर्वात मुख्य अडचण कांदा साठवणुकीच्या गोडाऊनची कमतरता असल्याचे कारण सांगितले जात आहे. यावर मंगल कार्यालये (लॉन्स) भाड्याने घेऊन कांदा खरेदी करावी. सात ते नऊ प्रतिकिलो दराने नाफेड कांदा खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणार नाही. नाफेडने केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त निधीतून 10 लाख मेट्रिक टन कांदा 20 रुपये प्रति किलो या भावाने खरेदी करावा अशी मागणी करण्यात आली आहे.