पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचे जिल्हा बॅंकेत ठिय्या आंदोलन

नगर – राहाता तालुक्‍यातील अकरा शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे भरण्यामध्ये जिल्हा बॅंकेने केलेल्या चुकीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांच्या दालनांमध्ये ठिय्या आंदोलन केले .आंदोलनानंतर बॅंकेला पिक विमा देण्यासाठी दोन महिन्याची मुदत द्यावी असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. दरम्यान यासंदर्भात शेतकऱ्यांनी बॅंकेने दिलेल्या मुदतीचे पालन केले नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ असा विश्वास सुद्धा दिला आहे.

या आंदोलनामध्ये अजित जोशी, संजय बधे, उदय सदाशिव बधे,सुमित आहेर, प्रमोद होले, दुष्यंत यशवंत बधे, तात्यासाहेब आहेर ,दुष्यंत बधे, विजय जोशी या शेतकऱ्यांचा समावेश होता. राहाता तालुक्‍यातील वाकडी येथील 11 शेतकऱ्यांचे 2018 मध्ये पिक विमा मिळण्यासाठी कर्ज रकमेतून विमा हप्ता भरला होता. ज्यावेळेला बॅंकेने अर्ज भरून घेताना जे नेमून दिलेले पुणतांबा सर्कल होते त्याऐवजी त्या ठिकाणी श्रीरामपूर सर्कल अशी नोंद झाली. त्यामुळे पिक विम्याच्या यादीमध्ये या शेतकऱ्यांची नावे आली नाही त्यांनी बॅंकेचे गेल्या पाच महिन्यांपासून पाठपुरावा केला होता.

त्यानंतर त्यांनी जिल्हा सहकारी उपनिबंधक संस्थेकडे सुद्धा अर्ज करून त्यांचे या संदर्भात लक्ष वेधले होते. मात्र बॅंकेने चूक दुरुस्त करायला पाहिजे होती ती केली नाही. त्यानंतर खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासमवेत दिल्ली येथे जाऊन कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी बोलणी केली होती. त्यावेळेस त्यांनी राज्य सरकार, जिल्हा सहकारी बॅंक व संबंधित विभाग कंपनी या ठिकाणी त्याची एकत्र दुरुस्ती करून द्यावी असे निर्देश दिले होते. एवढे होऊन देखील सुद्धा बॅंकेने याची दखल घेतली नाही व राज्य सरकारकडे दुरुस्तीसाठी नोव्हेंबरमध्ये पत्र पाठवले असे लक्षात आले. मात्र अद्याप पर्यंत त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

अखेरीला नाशिक सहकार निंबधकांनी या संदर्भामध्ये बॅंकेला संबंधित विम्याचे पैसे द्यावे असे आदेश दिले होते .त्यांनी दिलेल्या आदेशाचे जिल्हा बॅंकेने पालन केले नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला आलो असल्याचे अजित जोशी यांनी सांगितले .बॅंकेच्या आवारामध्ये आम्ही दोन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर बॅंकेचे अध्यक्ष सिताराम गायकर यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. बॅंकेच्या वतीने आम्हाला दोन महिन्याची मुदत द्यावी व आम्ही यातून मार्ग काढू असे लेखी आश्वासन बॅंकेच्या वतीने देण्यात आल्यानंतर आम्ही हे आंदोलन मागे घेतले असल्याचे जोशी यांनी सांगितले.जे लेखी आश्वासन दिले त्याची पूर्तता झाली नाही तर आम्ही न्यायालयामध्ये जाऊ असा इशारा सुद्धा या शेतकऱ्यांनी यावेळी दिला.

दरम्यान,शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले व सभापती रामदास भोर यांनी अशा प्रकारच्या चुका या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी झालेले आहेत. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून त्याची माहिती घेतल्यानंतर आम्हाला सुमारे 500 शेतकऱ्यांचा अशाच पद्धतीने विमा मिळालेला नाही अशी धक्कादायक बाब पुढे आलेली आहे .एकंदरीतच अर्ज भरून घेताना झालेल्या चुका या शेतकऱ्यांच्या अंगलट आलेल्या आहेत .

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.