शेतकरी आंदोलन : सुप्रिया सुळेंसह खासदारांना गाझीपूर बॉर्डरवर अडवले

नवी दिल्ली – नवे कृषी विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील दोन महिन्यापासून शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यसह देशभरातील अनेक खासदारांनी शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. परंतु, दिल्ली पोलिसांनी त्यांना सीमेवरच अडवले आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असून कामकाज सुरू होण्यापूर्वी खासदारांनी शेतकरी आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी सीमेवर पोहोचल्या. परंतु, पोलिसांनी त्यांना तीन किमी आधीच अडवले आहे. सर्व खासदार मिळून पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. 

यावर सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला असून त्या म्हणाल्या कि, शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही इथे गडबड करायला आलोय की काय अशा पद्धतीने प्रचंड मोठा पोलीस फौजफाटा आणि बॅरिकेट्स लावून आम्हाला रोखण्यात आले आहे. अन्नदाता सुखी भवं असे आपल्यावर संस्कार झालेले आहेत. मात्र, शेतकऱ्यांशी सरकार ज्या पद्धतीने वागतेय हे अतिशय दुर्देवी आहे. आम्ही संसदेत मागणी करतोय की यावर वेगळी चर्चा व्हावी. पण सरकार यासाठी तयार नाही. आम्ही शेतकऱ्यांशी चर्चाच करु नये, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

पाकिस्तान किंवा चीनच्या सीमेवरही नसेल इतकी कठोर बंधन येथे घातली आहेत. असंवेदनशील हे सरकार आहे, सरकारमधील लोकांना शेतकरी आपला वाटत नाही. आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही तर आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे जाणार आणि येथील परिस्थिती समजावून सांगणार आहोत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.