शेतकरी आंदोलन : शेतकरी त्यांच्या घरी असते तरी ते मेलेच असते ना… – भाजप नेते दलाल यांचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली – दिल्लीतील शेतकरी आंदोलनात आतापर्यंत झालेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू हा त्यांच्या इच्छेनुसारच झाला आहे. शेतकरी त्यांच्या घरी असते तरी ते मेलेच असते ना, असे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य हरियाणाचे कृषीमंत्री जे.पी. दलाल यांनी केले आहे.

शेतकरी आंदोलनाच्या मुद्दयावर रान पेटले असताना आणि त्यावरून भारतीय जनता पार्टीला रोषाला सामोरे जावे लागत असताना दलाल यांचे हे विधान बुडत्याचा पाय खोलात या म्हणीची प्रचिती देणारेच ठरले आहे.

राजधानी नवी दिल्लीच्या सीमेवर गेली अडीज महिने शेतकरी प्रतिकुल परिस्थितीत आंदोलन करत आहेत. वादग्रस्त कायदे रद्द करावेत अशी त्यांची मुख्य मागणी आहे. हाच सगळा संघर्ष सुरु असताना काही शेतकऱ्यांना प्राणासही मुकावे लागले आहे. त्यात त्यांचा अपमान करत शेतकरी आंदोलनाची खिल्ली उडवण्याचा प्रकार सरकारमधीलच काही मंत्र्यांकडून होतो आहे.

दरम्यान, दलाल यांनी शेतकरी आंदोलनावर अपमानजनक टिप्पणी केल्यानंतर देशभरातील शेतकरी नेत्यांनी तसेच चळवळीतील प्रमुख नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. सर्वत्र निषेधाचा सूर निघाल्याने माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला, असे म्हणत दलाल यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली.

शेतकरी नवी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. गेली अडीच महिने शेतकरी कशाचीही पर्वा न करता आपल्या मागण्यांसाठी लढत आहे. या लढाईत 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागलेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.