देशभरातील शेतकरी 26, 27 नोव्हेंबर रोजी संसदेसमोर करणार आंदोलन

 

कोल्हापूर – केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले तीनही कायदे रद्द करण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने देशभरातील शेतकरी 26 व 27 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे संसदेसमोर आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनास देशभरातील शेतकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेटटी यांनी दिली.

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले कायद्यामुळे देशातील शेती व्यवसाय उध्वस्त होणार आहे. सध्या पंजाब व हरियाणा येथील शेतकऱ्यांनी या कायद्याला विरोध करत आक्रमक आंदोलन सुरू केले असून येत्या 5 नोव्हेंबर रोजी संपुर्ण देशात दुपारी 12 ते 4 यावेळेत चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
केंद्र सरकार कायदा करत असताना या कायद्यामध्ये प्रत्येक शेतीमाल हमीभावाने खरेदी करण्याची अट घालणे गरजेचे होते.

मात्र सरकारचे कार्पोरेट कल्याण हे धोरण असल्याने शेतीमाल खरेदी करण्यासाठी हमीभाव बंधनकारक असल्याचे कुठेच उल्लेख केला गेला नाही. एकीकडे सरकारचे आयात निर्यातीचे धोरण स्थिर नसल्याने शेतकऱ्यांचा शेतीमाल कवडीमोल दराने विकला जात आहे. यामुळे देशातील जवळपास 300 हून अधिक संघटना एकत्रित येऊन “चलो दिल्ली’चा नारा देत या कायद्याविरोधात संसदेवर 26 व 27 रोजी धडक देणार आहेत.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या कार्यकारी समितीची आज दिल्ली येथील रकबगंज गुरूद्वार येथे 300 हून अधिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला, असेही शेट्टी यांनी सांगितले.

या बैठकीस महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, मध्यप्रदेश, केरळ, पश्‍चिम बंगाल, गुजरात, बिहार, जम्मू काश्‍मीर, राजस्थान येथील शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.