कोल्हापूर – मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी बॅंकेकडे विनवण्या करुनही कर्ज न दिल्याने शेतकऱ्याने आत्महत्या करुन आयुष्याचा शेवट केल्याची घटना घडली आहे. महादेव पाटील (वय वर्ष 45, रा. पिसात्री ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणात बॅंकेकडून कोणताही खुलासा आलेला नसला, तरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी कर्ज न दिल्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव पाटील यांचा मुलगा बीएचएमएसचे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्यामुळे त्याची वैद्यकीय शिक्षणाची फी भरण्यासाठी त्यांनी जवळच्या कॅनरा बॅंकेत संपर्क साधला होता. बॅंक मॅनेजरकडे दोनवेळा मागणी करुनही कर्ज नाकारण्यात आले होते. त्यामुळे नैराश्यात गेल्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
मयत शेतकरी महादेव पाटील यांच्या मित्रांकडून तसेच जवळच्या नातेवाईकांकडूनही बॅंक मॅनेजरला कर्जासाठी विनंती करण्यात आली होती, तरीही त्यांनी कर्ज दिले नाही. त्यामुळे आपल्या मुलासाठी कोणी कर्ज दिले नाही. त्यामुळे मुलाच्या भवितव्यावरुन तसेच मुलीचे लग्न न झाल्याने ते चिंतेत होते. या नैराश्यात त्यांच्या जुन्या राहत्या घरी त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.
दोन मित्रांनी सोबत संपविले जीवन
दरम्यान, चार दिवसांपूर्वीच हातकणंगले तालुक्यात दोन जिवलग मित्रांनी एकाच झाडाला एकाचवेळी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथे तात्यासाहेब कोरे वारणा मिलिटरी अकादमीच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरात एका झाडाला दोघा मित्रांनी एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. तालुक्यातील पारगावमध्ये बिरदेव नगर वसाहतीमध्ये राहणारे विनायक पाटील आणि त्याचा मित्र बाबासाहेब मोरे यांनी एकाच झाडाला आत्महत्या केली. दोघांवरही मोठ्या प्रमाणात कर्जाचा डोंगर असल्याने ते तणावात होते.