परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याची वीजेचा शाॅक घेऊन आत्महत्या

Madhuvan

यवतमाळ – परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. या नुकसानीमुळे हादरलेल्या उटी येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्याने स्वत:च्या शेतातच विजेची तार पायाला गुंडाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना रविवारी (18 ऑक्टोबर) सकाळी 8 वाजता घडली.

पंजाबराव गावंडे (वय-60, रा. उटी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गावंडे यांची अडीच एकर शेती आहे. त्यांनी त्यांच्या शेतात यावर्षी कापसाचे पीक घेतले होते. परतीच्या पावसाने त्यांचे पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे ते विवंचनेत होते. त्यांची पत्नीही दुर्धर आजाराने दोन वर्षांपासून अंथरूनाला खिळून आहेत. त्यांच्या उपचारासाठी गावंडे यांच्यावर कर्ज झाले आहे.

डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि पावसाने केलेले शेतीचे नुकसान यामुळे त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असावे असे बोलले जात आहे.

गावंडे हे नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेले होते. तेथे त्यांनी मोटारपंपाजवळ विजेची तार पायाला गुंडाळली आणि वीज प्रवाह सुरू केला. हा प्रकार शेजारी असलेल्या शेतकऱ्याने पाहिला.
त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्याजवळ पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर त्यांना सवना येथील रूग्णालयात नेले. तेथे डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यानंतर मुलाच्या फिर्यादीवरून महागाव पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गावंडे यांच्या मागे तीन विवाहित मुली व एक विवाहित मुलगा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.