नीरा, (वार्ताहर) – फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून शेतकरी आपल्या उत्पादनावरील खर्च तर कमी करू शकतोच त्याच मार्केटिंगचा खर्च देखील कमी होतो. 1960 -70 दशकात ज्या प्रमाणे लोकांनी सहकाराच्या माध्यमातून प्रगती केली त्याचप्रमाणे आता फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून प्रगती करावी.
त्यासाठी आपल्या गावात शेतकर्यांनी फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना करावी, असे आवाहन पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केले आहे. कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथे बुधवारी (दि. 28) आमदार जगताप यांच्या हस्ते पुरंदर अॅग्रोस्टार फार्मर प्रोड्युसर कंपनीचा शुभारंभ करण्यात आलात त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव, केव्हिके बारामतीचे संतोष गोडसे, डाळिंब तज्ज्ञ प्रवीण माने, परिक्षित त्यागी, महेश जाधव, डॉ. सुरेश माने, उमेश पाटील, शरद विजय सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब निगडे, निरेचे उपसरपंच राजेश काकडे, गुळूंचेचे माजी उपसरपंच संतोष निगडे,
कर्नलवाडीचे माजी उपसरपंच भरत निगडे, पृथ्वीराज निगडे, प्रकाश निगडे, लक्ष्मण वाघापूर, बबनराव ताटे, कंपनीचे संचालक राजेंद्र पवार, नवनाथ देवकर, प्रिया कोलते, अनिता सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकर्यांना शेती उत्पादन वाढीचे व उत्पादनातील खर्च कमी करण्यात संदर्भात विविध तज्ज्ञांच्यावतीने मार्गदर्शन करण्यात आले.
आमदार जगताप म्हणाले की, पुरंदर तालुक्यातील 700 शेतकर्यांनी एकत्रित येत फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून डाळिंब उत्पादन आणि फलोत्पादनामध्ये शेतकर्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
त्याचबरोबर शेतकर्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ही कंपनी मदत करणार आहे. कर्नलवाडीचे माजी सरपंच आणि प्रगतशील शेतकरी डाळिंब उत्पादक सुधीर निगडे यांच्या पुढाकारातून ही कंपनी सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कंपनीच्या सी. ओ. सुचिता जगताप यांनी तर संचालक सुधीर निगडे यांनी आभार मानले.