मुंबई – 1 शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य झाल्याने किसान मोर्चा स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा आमदार जे. पी. गावित यांनी केली आहे. शेतकऱ्यांचं लाल वादळ अखेर थांबलं आहे. नाशिकच्या दिंडोरीतून 12 मार्च रोजी विविध मागण्यांसाठी भाकप, किसान सभेचा लाँग मार्च सुरू झाला. दहा हजारांहून अधिक शेतकरी, कष्टकऱ्याचे हे मुंबईच्या दिशेने निघाले. माजी आमदार जे. पी. गावीत, डॉ. डी. एल. कराड, अजित नवले आदी या आंदोलनाचे नेतृत्व करीत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्च स्थगित करण्यात आला आहे. शेतकरी नेते जे पी गावित यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी दाखल होणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना नाशिकला सोडण्यासाठी बसेस आणि दोन रेल्वेची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. खरं तर नाशिकहून निघालेला लाँग मार्च ठाण्यात येताच शिंदे सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान, शेतकरी लाँगमार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांवर तातडीने निर्णय घेतानाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान जाहीर केले होते, त्यात आता वाढ करून ३०० रुपयांऐवजी ३५० रुपये सानुग्रह अनुदान, अशा विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. शेतकऱ्यांनी लाँगमार्च आंदोलन थांबवावे असे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले होते.