शेतकरी नेत्यांच्या ‘भूमिकेमुळे’ पश्चिम बंगाल निवडणुकांमध्येही भाजपची कोंडी होण्याची चिन्हे

रोहतक – केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी पश्‍चिम बंगालकडेही कूच करण्याचे सूतोवाच केले आहे. एका शेतकरी नेत्याचे वक्तव्य तर बंगालमधील निवडणुकीत भाजपची कोंडी होण्याची चिन्हे असल्याचे संकेत देणारे ठरले आहेत.

हरियाणात मंगळवारी शेतकरी महापंचायत झाली. त्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना राकेश टिकैत यांच्यासह विविध शेतकरी नेत्यांनी लवकरच विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या बंगालमध्येही जाण्याचा मनोदय व्यक्त केला. गुरनामसिंग चढुनी यांनी तर आणखी आक्रमक भूमिका मांडली.

बंगालमध्ये भाजप उमेदवारांचा पराभव झाला तरच आमचे आंदोलन यशस्वी ठरेल. बंगाली जनताही शेतीवर अवलंबून आहे. बंगालमध्ये जाऊन आम्ही शेतकऱ्यांना आपल्या उपजीविकेचे साधन हिरावून घेणाऱ्यांना मतदान न करण्याचे आवाहन करू, असे ते म्हणाले.

त्या वक्तव्यातून त्यांनी थेट भाजपला लक्ष्य केले. अर्थात, निवडणुकीत कुणाला मदत करण्याच्या उद्देशातून आम्ही बंगालला जाणार नाही. शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी तिथे जाऊ, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.