भोपाळ – मध्यप्रदेशमधील गुना येथे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी शेतकरी दाम्पत्याला मारहाण केली आहे. यानंतर दाम्पत्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेवरून आता राजकीय वातावरण तापले आहे.
मध्यप्रदेश घटनेवरून काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना लक्ष केले आहे. आमची लढाई याच विचार आणि अन्यायाविरोधात आहे, असे ट्विट करत राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. तर दुसरीकडे जिल्हाधिकारी आणि पोलीस निरीक्षकाला हटविण्याचे निर्देश सरकारने दिले असल्याचे ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितले.
हमारी लड़ाई इसी सोच और अन्याय के ख़िलाफ़ है। pic.twitter.com/egGjgY5Awm
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 16, 2020
काय आहे प्रकरण?
गुना जिल्ह्यात मॉडल कॉलेज बनविण्याच्या हेतूने शासकीय महाविद्यालय व्यवस्थापनाने जगनपूर चक परिसरात २० एकर जमीन ताब्यात घेतली आहे. या जमिनीवर अनेक दिवसांपासून गब्बू पारदी नामक व्यक्तीने कब्जा केला होता. काही दिवसांपूर्वीच महसूल आणि पोलीस पथकाने संयुक्तपणे अतिक्रमण हटवले होते. आणि जमीन महाविद्यालय व्यवस्थापनास सोपवली होती. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या जमिनीवर बांधकाम सुरु झाले नाही. यामुळे अतिक्रमणधारकांनी पुन्हा जमिनीवर कब्जा करण्यास सुरुवात केली.
माहितीनुसार, गब्बू पारदी व्यक्तीने ही जमीन काही शेतकऱ्यांना विकली होती. यानंतर शेतकऱ्यांनी त्या जमिनीवर शेती करण्यास सुरुवात केली. आठ महिन्यानंतर पुन्हा एकदा महसूल आणि पोलीस पथकाने जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता शेतकरी दाम्पत्याने विरोध केला. आम्ही जमीन विकत घेतली असून आता पूर्णपणे कर्जबाजरी झालो असल्याचे दाम्पत्याने सांगितले. मात्र पोलिसांनी काहीही न ऐकता शेतकरी दाम्पत्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर दाम्पत्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दाम्पत्याला उपचारकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.