बुलढाणा येथे शेतकऱ्याची आत्महत्या

मुख्यंत्र्याच्या सभेआधी घडली धक्कादायक घटना

बुलढाणा – विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात प्रचाराचा धुराळा उडत असताना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळीच एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. “पुन्हा आणूया आपले सरकार’ असे लिहलेला भाजपचा टी-शर्ट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याने घातला आहे.

राज्यात सध्या विधानसभेचे वारे असून शेतकऱ्यांनाही अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. मात्र, सध्या प्रचाराच्या धामधुमीतच शेतकरी आत्महत्येने खळबळ उडाली आहे.

जळगाव जामोद इथून कामगार मंत्री डॉ. संजय कुटे आमदार आहेत. हा प्रकार शेगाव तालुक्‍यातील खातखेड येथे रविवारी सकाळी 11 वाजता उघडकीस आला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजू ज्ञानदेव तलवारे असे 35 वर्षीय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, याप्रकरणी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही बाजू मांडण्यात आलेली नाही. दुसरीकडे, शनिवारी संध्याकाळी येवल्यातही एका तरुण शेतकऱ्याने कर्जबारीपणामुळे आत्महत्या केली. त्यामुळे भर निवडणुकांमध्येही शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याने शेतकऱ्यांसाठी झालेल्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.