रेल्वेच्या दडपशाहीविरोधात शेतकरी आक्रमक

स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा

कराड- कराड व कोरेगांव तालुक्‍यातील सोळा गावच्या बाधित शेतकऱ्यांची जोपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत रेल्वे विभागाला काम न करण्याच्या सूचना दिल्या असतानाही पुणे-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरु करण्यात आले असून या कामाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार केला आहे. रेल्वे प्रशासनाने बाधितांना योग्य तो न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन शनिवारी पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांना बाधित शेतकऱ्यांनी दिले. यावेळी अनिल घराळ, मेजर रामचंद्र माने, कृष्णा मदने, मनोज ढाणे, अनिल डूबल, प्रसाद धोकटे, शंकर आतकरे, योगेश चव्हाण, विजय पवार, योगेश झांबरे, सज्जन माने, बाळासो पोळ, शहारुख मुल्ला, संभाजी पवार, ओमकार पवार, रोहित पवार उपस्थित होते.

कराड व कोरेगांव तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी रेल्वेच्या अन्याया विरोधात स्वाभिमानीचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली व सातारा जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्या नेतृवाखाली आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र लढा उभा केला आहे. स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंगल, खा. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत रेल्वे अधिकारी मित्तल, तोडासे, सचिन नलवडे व बाधित शेतकरी यांची बैठक झाली.

या बैठकीत जोपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत रेल्वे विभागाने काम न करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. यावेळी कराड व कोरेगांव तालुक्‍यातील सोळा गावांचे यापूर्वी भूसंपादन झाले नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी मान्य केले होते. तसेच मोजणीसाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी मोजणीस सहकार्य केले आहे. बऱ्याच गावांची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु रेल्वे विभागाच्या दिरंगाईने भूसंपादनाची प्रक्रिया रखडली आहे.

दरम्यान, कालगाव येथील योगेश चव्हाण यांच्या शेतामध्ये तारगाव खिंडीतील रेल्वे फाटकाजवळ रेल्वे विभागाने सुरु केलेल्या इमारत बांधकामास सदर शेतकऱ्यांने हरकत घेतल्याने संबंधित अधिकाऱ्यांने उंब्रज पोलीस स्टेशनला शेतकरी रामचंद्र माने यांच्यावर गुन्हा दाखल केला. यानंतर स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी बाधित शेतकऱ्यांसह उंब्रज पोलीस स्टेशनला धाव घेत पोलीस निरीक्षक अजय गोरड यांना माहिती देवून रेल्वेच्या अन्यायाचा पाढा वाचला. त्यानंतर जिल्हाधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी कराड यांना भेटून रेल्वे अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतात अतिक्रमण करुन शेतकऱ्यांवरच खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिली.

ओगलेवाडीचे शेतकरी राहुल पवार, विमल पवार यांची 60 वर्षापूर्वी एक एकर जमीन संपादित रेल्वेमध्ये गेली असून आता 15 गुंठे क्षेत्र शिल्लक आहे. सध्या या शेतकऱ्यांच्या शेतीसमोर रेल्वेच्या इमारतीचे बांधकाम सुरु होणार आहे. हे बांधकाम झाल्यास शेतीला ये-जा करण्याचा रस्ता बंद होणार आहे. तरी शेतकऱ्यांना शेतीसाठी रस्ता सोडून रेल्वेने बांधकाम करावे. अन्यथा पूर्ण जमीन संपादित करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here