मान्सूनचा शिडकावा झेलण्यासाठी शेती तयार

अकोले तालुक्‍यात यंदा खरिपाचे क्षेत्र 31 टक्‍क्‍यांनी वाढणार 

अकोले, दि. 21 (प्रतिनिधी) -मान्सूनचा शिडकावा झेलण्यासाठी शेत जमीन तयार झाली आहे. अकोले तालुक्‍यात यंदा खरीपाचे क्षेत्र 31 टक्‍के वाढण्याची शक्‍यता कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी व्यक्त केली. पावसाळ्याचा श्रीगणेशा करणाऱ्या रोहिणी चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. त्या वेळेवर सुरु होतील, अशी अपेक्षा सर्व जण बाळगून आहेत.तर 7 जूनला मृग नक्षत्र सुरु होईल. आणि पावसाची सुरुवात आनंददायी राहिली तर मृगाच्या वाफेवरच खरीपाची पेरणी होईल.

मान्सूनचा शिडकावा यावर्षी खरीपासाठी वेळेत दाखल होईल, अशी अपेक्षा शेत जमीन तयार केलेल्या शेतकरी वर्गाला आहे. अकोले तालुक्‍यातील खरीपाची शेती आता मान्सूनसाठी तयार झाली आहे. करोनाच्या लॉकडाऊनमध्ये नांगरणी, दुणनी करुन शेतजमीन उन्हाच्या तापाने काळीभोर झाली आहे. ऐपतीप्रमाणे अनेक शेतकऱ्यांनी शेणखताची मात्रा शेतीला देऊन जोमदार खरीपाची तयारी केली आहे.

मान्सूनने चांगली साथ दिली तर संपूर्ण अकोले तालुक्‍यात खरीप हंगामात भात, बाजरी, नागली, मका, तृणधान्य, कडधान्य, भुईमूग, खुरसणी, सोयाबीन ही पिके कायम जोमाने डोलतील.नदीनाले, डोंगरदऱ्या आणि धरणांचा तालुका असल्याने ऊसशेतीही पावसाळ्यात जोरदार उभारी घेईल.
मागील हंगामात 36 हजार 365 हेक्‍टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली होती. यावर्षी 47 हजार 763 हेक्‍टर क्षेत्रात उभा राहील असा अंदाज कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी व्यक्त केला.ही वाढ गतवर्षीच्या तुलनेत 31 टक्‍के अधिक अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले. खरीप हंगाम ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पावसावर याचे सारे गणित अवलंबून आहे.पेरणीपूर्व मशागतीची कामे सूरु करून पेरणीसाठी शेत आता तयार होण्याच्या मार्गावर आहेत.

यंदा मान्सून लवकर येईल असा अंदाज हवामान खात्यानेही मध्यंतरी व्यक्त केला होता. पंचांगकर्त्यांच्या होऱ्यात नक्षत्रांचेही देणे समाधानकारक दिसत असल्याने सध्यातरी शेतकरी भविष्यावर समाधानी आहे. खरीप हंगाम सरासरीइतका राहणार हा अंदाजही शेतकरी आणि सरकारसाठी सुखावणारा आहे. मान्सूनचा शेतकऱ्यांच्या जीवनावर व्यापक परिणाम होतो हे वास्तव आहे. शेतकऱ्यांच्या सुख-दु:खाच्या मोजमापाची फूटपट्टी मान्सूनच्या हातात आहे.त्यामुळे शेती, शेतकरी आणि देशालाही आनंद देणारा मान्सूनचा शिडकावा अकोले तालुक्‍यासाठी आनंददायी ठरेल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.