काही दिवसांपूर्वीच अदर पूनावाला यांनी कोविशिल्डच्या डोसची किंमत वाढवल्याची घोषणा केली होती. त्यावरून देशात संमिश्र प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यावरून अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर याने थेट सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनाच सवाल केला आहे. कोविशिल्ड लसीच्या वाढलेल्या किमतीवरून फरहान अख्तरने अदर पूनावालांना विचारणा केली.
फरहान अख्तरने ट्विट करून यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटला टॅग केले आहे. करोना व्हॅक्सिन 150 रुपये प्रतिडोस विकल्यानंतर देखील नफा कमावल्याचे तुम्ही म्हणालात. पण आता आम्हाला जगात कोविशिल्डच्या लसीसाठी सर्वाधिक किंमत मोजावी लागणार आहे. कृपया समजावून सांगा असं का?असं फरहान ट्विटमध्ये म्हणाला आहे. ट्विटसोबत फरहानने एक बातमी देखील पोस्ट केली आहे.
अदर पूनावाला यांनी सुरुवातीला 150 रुपये प्रतिडोस व्हॅक्सिन विक्री करतानाही नफा कमावत असल्याचं सांगितलं होतं. पूनावाला यांनीच सुरुवातीचे 10 कोटी डोस फक्त 200 रुपयांच्या विशेष किमतीमध्ये दिले जातील आणि नंतर हीच लस खासगी बाजारपेठेमध्ये 1 हजार रुपये प्रतिडोस विक्रीसाठी दिली जाईल, असेदेखील म्हटले होते. त्यानंतर आता जाहीर केलेल्या किमतीवरून फरहानने टीका केली आहे.