फरहान बनला शायर

साधारण 45 वर्षांपूर्वी आलेल्या राज कपूर यांच्या “बॉबी’ या चित्रपटाची अनेक कारणांसाठी चर्चा झाली होती. चाईल्ड आर्टिस्टच्या भूमिकांनंतर ऋषी कपूर पहिल्यांदाच या चित्रपटातून थेट हिरोच्या रुपात दिसला होता. डिंपल कपाडियानेही याच चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात डिंपल आणि ऋषी कपूरच्या प्रवेशावेळी दाखवण्यात आलेले “मैं शायर तो नहीं…’ हे गीत आजही प्रचंड लोकप्रिय आहे.

सध्या हे रोमॅंटिक सॉंग एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. हे कारण आहे फरहान अख्तरशी संबंधित. एम टीव्हीची व्हीजे अँकर शिबानी दांडेकरच्या प्रेमात फरहान इतका दिवाना झाला आहे की तो आता शायर बनला आहे. आपली पत्नी अधुना अख्तरपासून वेगळे झाल्यापासून शिबानी आणि फरहान ही जोडगोळी सातत्याने एकत्र फिरताना दिसत आहे. या दोघांमधील वाढती जवळीक सोशल मीडियावरही दिसून येऊ लागली आहे. फरहान स्वतः आपले आणि शिबानीचे फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करत असतो. काही दिवसांपूर्वी झालेल्या व्हॅलेंन्टाईन डेच्या दिवशी फरहानने शिबानीसाठी एक शेर लिहिला तेव्हा त्याचे सर्व मित्रगण आश्‍चर्यचकित झाले. “तुम मुस्कुराओ जरा, चिराग जलाओ जरा, अंधेरा हटाओ जरा, रोशनी फैलाओ जरा’ असा हा शेर चांगलाच गाजला.

फरहान हा गीतकार जावेद अख्तर यांचा मुलगा असला तरी आजवर त्याने कधीही शायरी केलेली नव्हती. मागील काळात त्याने पार्श्‍वगायन केले होते. पण आता शिबानीच्या प्रेमाने त्याला शायर बनवल्याचे दिसत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.