“डीजेवाले बाबू’, “मर्सी’, “बझ’ या गाण्यांसाठी प्रसिद्ध असणारा रॅपर बादशाहचे आणखी एक गाणं सोशल मीडियावर काही काळातच हिट ठरले आहे. सध्या सर्वजण लॉकडाऊनमुळे घरातच आहेत. अशावेळी सोशल मीडिया हे एकमेव साधन आहे, ज्यामुळे लोकांचं मनोरंजन होत आहे.
अशा परिस्थितीत बादशाहचं हे गाणं खूप लाइक्स आणि कमेंट्स मिळवत आहे. “गेंदा फूल’ या गाण्याच्या म्युझिक व्हिडीओमध्ये जॅकलिन फर्नांडिसही बादशाहसोबत थिरकताना दिसली आहे. ज्यामध्ये नेहमीप्रमाणेच जॅकलिन तिच्या हॉट अंदाजामध्ये दिसली आहे.
या गाण्यामध्ये फेस्टिव्ह आणि पारंपरिक अंदाज आहे. स्नेहा शेट्टीने दिग्दर्शित केलेला हा म्युझिक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये बंगाली दुर्गा पुजेचा समारोह वेगळ्या अंदाजात साकारण्यात आला आहे. यामध्ये जॅकलिन लाल आणि पांढऱ्या रंगाच्या साडी नेसून पारंपरिक बंगाली अंदाजात दिसत आहे. यातील बेंगाली ओळी गायिका पायल देवने गायल्या आहेत.
करण जोहरने ट्विटरवर या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यूट्युबवर आतापर्यंत 33 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. काही दिवसांपूर्वी जॅकलिन बिग बॉस फेम आसिम रियाझबरोबर ःमेरे अंगने मे’ या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली होती. हा व्हिडीओ देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.