प्रसिद्ध वऱ्हाडी साहित्यिक पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन

अकोला – वऱ्हाडी साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील एका वैभवशाली पर्वाने अकाली “एक्‍झीट’ घेतली आहे. सुप्रसिद्ध वऱ्हाडी कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्‍यातल्या सुटाळा येथे त्यांनी बुधवारी शेवटचा श्वास घेतला. मृत्युसमयी ते 63 वर्षांचे होते. गेल्याचवर्षी त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले होते. त्यांच्या निधनाने वऱ्हाडी साहित्य आणि नाट्यक्षेत्रात अपरिमीत नुकसान झाले आहे.

कादंबरीला अफलातून नावे देत अस्सल विनोदी लेखनातून सत्यस्थिती मांडणारे लेखक म्हणून ते सुपरिचित होते. मूळ अकोलेकर असणारे बोरकर बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे मुलाकडे राहात होते. त्यांनी काही काळ अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत नोकरीही केली. त्यानंतर “दैनिक देशोन्नती’ या वृत्तपत्रात अनेक वर्ष “होबासक्‍या’ हे विनोदी सदरही चालविले.

त्यांनी वर्तमान स्थितीवर विडंबनात्मक भाष्य करणाऱ्या अनेक कविताही लिहिल्या आहेत. तसेच 15 ते 20 गझलाही लिहिल्या. 10 ते 15 चरित्रात्मक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. यात डॉ. रवी चरडे, दिवंगत गोविंदराव वंजारी, दिवंगत कृष्णराव पांडव या विदर्भातील नेत्यांवरचे त्यांचे लेखनही चांगलेच गाजले. त्यांनी मराठी साहित्यात 45 पेक्षा अधिक विविधांगी पुस्तकं लिहिली आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)