मुंबई : मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्त्री 2 सिनेमातील ‘आज की रात’ या गाण्याचे कोरिओग्राफर जानी मास्टर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना POCSO कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. 21 वर्षीय महिला कोरिओग्राफरने जानीवर लैंगिक छळाचे आरोप करत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
सहा वर्षांआधी एका आउटडोर शूटिंग दरम्यान, घरात तिचा लैंगिक छळ करण्यात आला होता असे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. शहरातील अनेक महिलांबरोबर त्याने असे केले असल्याचा आरोपदेखील या महिलेने केला आहे. जानी विरोधात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 376 (2) (लैंगिक अत्याचारासाठी शिक्षा), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि 23 (स्वैच्छिकपणे दुखापत करणे) यासह अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महिला अल्पवयीन असताना जानीने तिचे लैंगिक शोषण केल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले आहे, त्यामुळे त्याच्यावर POCSO देखील लावण्यात आला आहे.
जानी हा साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. त्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याने ‘स्त्री 2’ सिनेमातील ‘आज की रात’ हे तमन्ना भाटियाचे गाणं कोरिओग्राफ केले आहे. त्याचबरोबर रजनीकांतच्या ‘जेलर’मध्ये आयटम साँग ‘कावाला’ देखील त्याने डायरेक्ट केले होते. कोरिओग्राफर जानी याने या आरोपांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.