नवी दिल्ली – इतिहास, वास्तुकला आणि भारतीय शास्त्रीय नृत्य या कलाप्रकारांमधील प्रसिद्ध तज्ज्ञ कपिला वात्स्यायन यांचे आज दिल्लीत राहत्या घरी निधन झाले. त्या 91 वर्षांच्या होत्या.
गुलमोहर एन्क्लेव्ह येथील घरी सकाळी 9 वाजता कपिला वात्स्यायन यांचे निधन झाले, असे ‘इंडियन इंटरनॅशनल सेंटर’चे सचिव कंवल अली यांनी सांगितले.
कपिला वात्स्यायन या ‘इंडियन इंटरनॅशनल सेंटर’च्या आजीव विश्वस्त होत्या. ‘इंडियन इंटरनॅशनल सेंटर’च्या आशिया प्रकल्पासाठीच्या त्या अध्यक्षा आणि इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टसच्या त्या संस्थापक संचालिकाही होत्या.
वात्स्यायन यांच्या पार्थिवावर लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले गेले. करोनाच्या साथीमुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे या प्रसंगी अगदी मर्यादित जणांना उपस्थित राहिले होते.