गीर गायींवर चालतोय कुटुंबाचा गाडा

दुधाचा व्यवसाय सचोटीने : गुजरातमधील कुटुंबांचे 20 वर्षांपासून वाघळवाडीत वास्तव्य

– तुषार धुमाळ

वाघळवाडी – आपल्या भारतीय गोवंशामध्ये “गीर’ हा गोवंश दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गुजरात राज्याचा पश्‍चिम व दक्षिण भाग, महाराष्ट्र राज्याचा गुजरातच्या सीमेलगतचा प्रदेश, राजस्थानातील “टोंक’ आणि “कोट’ हे जिल्हे गीर’ गोवंशांचे उगमस्थान मानले जाते. मात्र, गेल्या 20 वर्षांपासून मूळचे गुजरातचे असलेले चार कुटुंब वाघळवाडी परिसरात गीर गायी-म्हशींवर आपला संसाराचा गाडा हाकत आहेत. प्रत्येक कुटुंबाकडे जवळपास 70 देशी गीर गायी व 15 म्हशी अशा एकूण 250 ते 300 गायी व 50 ते 100 म्हशी असा पसारा आहे.

नथुराम परमार, कैलास परमार, पोपट परमार, शाम राठोड मूळचे लिबडी (ता. लक्‍तर, जि. सूर्यदर्शन, राज्य गुजरात) गावचे रहिवासी. आजोबा वडिलांपासून हा व्यवसाय करीत ते महाराष्ट्रातच राहतात. 30 ते 40 वयाच्या आसपासचे हे चौघे कुटुंबासमवेत येथे वास्तव्यास आहेत. साखर कारखाना सुरू झाला की, ऊस तोडणी कामगारांच्या असलेल्या वसाहतीमध्ये बैलांना टाकलेल्या चाऱ्यातील शिल्लक राहिलेली उष्टावळ गोळा करायची हा त्यांचा पहाटेपासूनचा दिनक्रम बैलगाडी भरायची चारा-गुरांना खायला टाकायचा शिल्लक राहिलेल्या चाऱ्याची साठवण करायची. पुढच्या आठ महिन्यांचे नियोजन करणे. पावसाळ्यामध्ये रस्त्याच्याकडेला मोकळ्या जागेत उगवलेल्या गवतांवर गुरे चारून गुजराण करावी लागते. तर गायींचे दूध व शेणखतापासून मिळणाऱ्या उत्पादनातून गुरांचा व घराचा गाडा कसाबसा चालवत आहेत.

महिन्याला मिळतो 21 हजारांचा नफा
गायी आणि म्हशीपासून महिन्याला 49 हजार 500 रुपये निघते. त्यात महिन्याला शेणखातून 7 हजार, गोमुत्रापासून 1 हजार रुपये म्हणजेच महिन्याला 57 हजार 500 रुपये मिळतात. यातून गाय-म्हशीच्या पालनपोषणासाठी 36 हजार रुपये खर्च होतो म्हणजेच महिन्याला साधरणत: 21 हजार रुपये एका कुटुंबाला नफा मिळतो. यात आपण त्यांचा घरघुती खर्चाचा समावेश केलेला नाही.

देशी गीर गायीच्या दुधाचे फायदे
– व्हिटॅमिन बी 12 या प्रकारचे घटक आपल्या शरीराला भेटतो आणि शरीरातील पेशींसाठी व शरीरातील हाडांसाठी अत्यंत लाभदायी असते.
– मधुमेह, कर्करोग, रक्‍तदाब, हृदयविकाराचा झटका आदी महाभयंकर आजारापासून मुक्‍तता मिळू शकते.
– चांगल्या कोलेस्टेरॉलच्या निर्मितीसाठी उपयुक्‍त
– लहान मुले व वृद्धांसाठी अत्यंत उपयोगी व लहान मुलांच्या पचन संस्थेसाठी उपयोगी
– बालकांच्या मेंदूची वाढ व विकासासाठी (2 युक्त)

2004 मध्ये आम्ही गुजरातला गावाकडे जायचे धाडस केले. ऑगस्ट ते सप्टेंबर अशी दोन महिने सारा पसारा घेऊन पायपीट केली. 15 दिवस जंगल वाटेतून पाय प्रवासही केला.ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पायी चालण्याचा निर्णय योग्य ठरला कारण वाटेने गायींना चारा मिळत गेला. तांडा गावाकडे पोहोचला गावाकडे दोन-तीन दिवस मजेत गेले, नंतर तिथे असलेले हवामान खारेपाणी आणि चारा हे गायींना पचत नव्हता, त्याचे परिणाम दिसू लागले. कसेतरी वर्ष काढले. 2005 परत माघारी आलो.
– नथुराम परमार, गवळी 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.