पुणे : कौटुंबिक न्यायालयाच्या कामकाजाला गती मिळणार

न्यायालयाच्या कामकाजात अडीच तासांनी वाढ

पुणे(प्रतिनिधी) – कौटुंबिक न्यायालयाच्या कामकाजाची वेळ अडीच तासाने वाढविण्यात आली आहे. सकाळी 11 ते 2 या वेळेत कामकाज चालायचे. सोमवारपासून (दि. 2) सकाळी साडेदहा ते दुपारी चार या वेळेत चालणार आहे. यामुळे न्यायालयाच्या कामकाजाला गती मिळणार आहे. ज्या पक्षकार अथवा वकिलांची सुनावणी आहे. त्यांनाच प्रत्यक्ष हजर राहता येणार आहे. 

करोनामुळे कामकाजावर मोठा परिणाम झालेला आहे. केवळ तातडीच्या दाव्यांचीच न्यायालयात सुनावणी होते. मुलांचा ताबा, पोटगीचे दावे, परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचे दावे यावर सुनावणी प्रामुख्याने सुरु आहे. कामकाज एकाच सत्रात होणार असून, केवळ वेळ वाढविण्यात आली आहे.

कामासाठी आवारात वावरताना मास्क, सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित अंतराचे पालन करणे बंधनकारक आहे. संबंधित दाव्यातील पक्षकार आणि वकिलांनाच फक्त हजर राहता येणार असले तरी व्हिडीओ कॉन्फरसिंगचा वापर अधिक करण्यात यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

याविषयी दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, पुणेच्या अध्यक्षा अॅड. वैशाली चांदणे म्हणाल्या, दिवाळी काही दिवसांवर आली आहे. पालकांनी मुलांच्या ताब्याबाबत अर्ज केलेले असतात. या आणि इतर अर्जावर न्यायालयीन कामकाज वाढविल्याने लवकर आदेश होतील. न्यायालयाच्या कामाला गती मिळेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.