हैदराबाद : एका वंचित कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकल्याच्या आरोपावरून तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील एका गावातील 16 जणांना अटक करण्यात आली आहे. या कुटुंबाने गावातील एका व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी डप्पू (तारी वाद्य) वाजवण्यास नकार दिल्यामुळे कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला गेला होता असे पोलिसांनी सांगितले.
अनुसूचित जातीतील मडिगा समाजातील हे कुटुंब बऱ्याच काळापासून डप्पू वाजवण्याचे काम करतात. गावात कोणाचे तरी अंत्यसंस्कार करायचे होते. गावकऱ्यांनी डप्पू वाजवायला सांगितल्यावर त्यांनी नकार दिला. यानंतर पंचायत झाली आणि पंचायतीमध्ये या कुटुंबाला समाजातून बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले.
वंचित कुटुंबात दोन भाऊ आहेत, एक पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि दुसरा हैदराबादमध्ये नोकरी करतो. समारंभात वाद्ये वाजवण्यासाठी त्यांच्यावर त्यांच्याच समाजातील काही गावकऱ्यांकडून दबाव आणला जात होता. मात्र, दोन्ही भावांनी वाद्य वाजवण्यास नकार दिला.पोलिसांनी सांगितले की, त्यांना घराचे बांधकाम करू न दिल्याचाआणि कुटुंबाला पाण्याचे कनेक्शन न दिल्याचाही गावाच्या उपसरपंचावर आरोप आहे. काही ग्रामस्थांनी 10 सप्टेंबर रोजी बैठक घेतली आणि दोन्ही भावांनी त्यांच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय सुरू ठेवण्याच्या सूचनांचे पालन न केल्यास कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचे आदेश दिले.
सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल वंचित कुटुंबाला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा इशारा दिला असता त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर, 12 सप्टेंबर रोजी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा आणि नागरी हक्क संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत सोळा जणांना अटक करण्यात आली असून अन्य 15 फरार लोकांना पकडण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. त्याच वेळी, दोन्ही भावांनी तेलंगणा उच्च न्यायालयातही धाव घेतली, त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना पीडित कुटुंबाला सुरक्षा देण्याचे निर्देश दिले. यानंतर मेडकचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनीही पीडित कुटुंबीयांची भेट घेतली.