ना. बाळासाहेब पाटील; राष्ट्रीय खो खो स्पर्धेस उत्साहात प्रारंभ
फलटण (प्रतिनिधी) – लोककला व देशी खेळांना फलटणमध्ये संस्थानकाळापासून प्रोत्साहन मिळत आहे. देशी खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन येथे यापूर्वीही झाले आहे. राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्याची वारंवार संधी मिळणे, हे फलटणकरांचे भाग्य असल्याचे प्रतिपादन सहकार व पालक मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि फलटण एज्युकेशन सोसायटी व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्यावतीने येथील घडसोली मैदानावर शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडानगरीत 65 व्या राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धेचे उद्घाटन ना. पाटील यांच्या हस्ते आज झाले. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर अध्यक्षस्थानी होते. आ. दीपक चव्हाण, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सुभद्राराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष सौ. नीता नेवसे, पंचायत समितीच्या उपसभापती सौ. रेखा खरात, सदस्य विश्वजितराजे नाईक निंबाळकर, सौ. रेश्मा भोसले, संजय कापसे, नानासाहेब लंगुटे, सत्यजितराजे नाईक निंबाळकर, क्रीडा व युवक सेवा सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, उपसंचालक डॉ. माणिकराव ठोसरे, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, फलटणचे तालुका क्रीडाधिकारी अनिल शिंदे, खंडाळ्याचे तालुका क्रीडाधिकारी महेश खुटाळे, शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे पदाधिकारी, खेळाडू व नागरिक उपस्थित होते.
ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, खो खो, कबड्डी व अन्य खेळांच्या राज्य व राष्ट्रीय स्पर्धा स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या नियोजनाशिवाय यशस्वी होत नाहीत. फलटणला स्वातंत्र्यपूर्व काळापासून खेळाची उज्ज्वल परंपरा लाभल्याने या भूमीत असंख्य नामवंत खेळाडू तयार होत आहेत. रामराजे व संजीवराजे यांनी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे.
रामराजे म्हणाले, खो खोची पंढरी म्हणून फलटणचा लौकिक होत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खो खो व कबड्डीला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. कबड्डीनंतर आता खो खोदेखील आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी त्यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभेल.
संजीवराजे म्हणाले, या स्पर्धेत मुलामुलींचे प्रत्येकी 30 संघ संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेतील एक हजार खेळाडू, 250 प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक, 100 पंच यांची निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी चार मैदाने व पाच हजार क्षमतेची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. फलटण एज्यूकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे यांनी आभार मानले.
दरम्यान, शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लमाणी नृत्य, दांडपट्टा, लाठ्याकाठ्यांचे प्रात्यक्षिक केले. प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी छ. शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्ये सादर केली. मालोजीराजे शेती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीमचे प्रकार सादर केले. राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक विजेती देविका घोरपडे (बॉक्सिंग), प्रतीक्षा खुरंगे व प्रांजल माडकर (खो खो), अभिजित (सायकलिंग) या फलटणच्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. ना. बाळासाहेब पाटील यांचा फलटणकरांच्यावतीने रामराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.