केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचा खोटा प्रचार

देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर जोरदार टीका

मुंबई – करोनाच्या संकटात महाराष्ट्रावर केंद्र सरकार अन्याय करत आहे. केंद्र सरकारकडून राज्याला योग्य ती मदत केली जात नाही, असा खोटा प्रचार राज्य सरकारमधील नेते करत आहेत. अशारीतीने केंद्र सरकार विरोधात वातावरण तयार केले जात आहे. वारंवार खोटी वक्तव्य केली की ते लोकांना खरे वाटू लागते. मात्र केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना वाटप केले जाते. महाराष्ट्राला यात जास्तच मिळते आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने आतापर्यंत 28 हजार 14 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला दिला आहेत. एप्रिल-मे महिन्याचा आगाऊ निधी केंद्र सरकारने दिला आहे. शेतीसाठी केंद्र सरकारने 9 हजार कोटी रुपये दिले आहेत. पीपीई किट आणि एन 95 मास्कचा पुरवठा केंद्र सरकारने केला. श्रमिक विशेष रेल्वेसाठी 300 रुपये दिले. मजुरांच्या छावण्यांसाठी 1611 कोटींची मदत केली. राज्याला 4 हजार 592 कोटींचे अन्नधान्य दिले, अशी आकडेवारी देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेसमोर मांडली.

करोनाच्या परिस्थितीतही राजभवन आणि मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरु आहे. या बैठका करोनाच्या उपाययोजना संदर्भात आहेत की राजकीय खलबतांसाठी हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र या परिस्थितीत करोना या विषयाला प्राधान्य असायला हवे. भाजपमध्ये सरकार अस्थिर करण्याची कुठलीही हालचाल सुरू नाही. हे सरकार त्यांच्याच कर्माने जाईल. या सरकारकडून काही गोष्टी जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत ज्याच्यामुळे मूळ विषयापासून लोकांचे लक्ष हटेल, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना एकटे पाडले…
राहुल गांधी यांचे वक्तव्य आश्‍चर्यकारक आहे. करोनाची परिस्थिती हाताबाहेर जाण्याची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ढकलायची आणि बाजूला व्हायचे, असे यातून दिसून येत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात आहे, अशा वेळेस मुख्यमंत्र्यांचे सहकारी त्यांची साथ सोडत आहेत असे लक्षात येत आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील सरकारला कॉंग्रेसचा पाठिंबा आहे. मात्र ठाकरे सरकारमध्ये कॉंग्रेसला मोठे निर्णय घ्यायचा अधिकार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.