ग्राहक मंचात खोटी तक्रार पडणार महागात

दोन प्रकरणांत नुकसान भरपाईसाठी खोटी तक्रार करणाऱ्यांनाच दंड

– विजयकुमार कुलकर्णी

पुणे – ग्राहक मंचात खोटी तक्रार करताय, सावधान. तुम्हाला दंड होऊ शकतो. ग्राहक मंचात खोटी तक्रार दाखल केली, तर तक्रारदारालाच दंड भरावा लागतो, असे येथील ग्राहक मंचाने दिलेल्या 2 निकालांतून स्पष्ट झाले आहे. सेवेत दोष नसतानाही ती पूरविणाऱ्या विरोधात ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दिली म्हणजे आपल्याला नुकसान भरपाई मिळेल, अशी काही ग्राहकांची समजूत आहे. ग्राहक मंचाच्या या निर्णयाने या समजुतीला आळा बसण्याची शक्‍यता आहे.

सेवेत त्रुटी राहिल्यास ग्राहकाला दाद मागता यावी, यासाठी मंच कार्यरत आहे. मात्र, त्यात सेवा पूरविणाऱ्यांना देखील संरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे खोट्या तक्रारी दाखल केल्यास किंवा योग्य कागदपत्रे सादर न केल्यास तक्रारदारांना भुर्दंड सोसावा लागत आहे. बॅंकेचे डेबिट कार्ड परदेशात वापरता न आल्याने 1 लाख रुपयांचे नुकसान झाले, अशी तक्रार एका जोडप्याने स्टेट बॅंक ऑफ इंडिया विरोधात दिली होती. त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, संबंधित कार्ड आधी भारतात वापरावे लागते. त्यानंतर त्यांचा वापर परदेशात करता येऊ शकतो. ही प्रक्रिया माहिती असताना देखील तक्रारदारांनी ती पूर्ण केली नाही, असे बॅंकेने मंच्याच्या निदर्शनात आणून दिले. त्यामुळे मंचाने तक्रारदारांनाच 5 हजारांचा दंड ठोठावला.

दुसऱ्या प्रकरणात एका खातेदाराने ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स विरोधात तक्रार केली होती. तक्रारदारांना त्यांच्या ओळखीच्या व्यक्‍तीने 50 हजार रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र, तो 3 महिन्यांची मुदत संपल्यानंतर बॅंकेत दाखल झाला. त्यामुळे तो वटला नाही. त्यात ओरिएंटल बॅंकेची चूक नव्हती. तसेच तक्रारदार बॅंकेचा खातेदार देखील नव्हता. त्यामुळे त्याने केलेली तक्रार मंचाने रद्द करीत 5 हजार रुपयांचा दंड सुनावला.

तक्रारदार अनेकदा दावा दाखल करताना पुराव्याची पुरेशी कागदपत्रे देत नाहीत. सेवा देणाऱ्यांना त्रास देण्यासाठी तक्रार केल्याचेही प्रकार घडतात. या सर्व प्रकारांना आळा बसला पाहिजे. जेणेकरून अशा प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयाचा वेळ जाणार नाही. दंड झाल्यास तक्रारदार खोट्या तक्रारी करण्यास धजावणार नाहीत.
– ऍड. भूपेंद्र गोसावी, माजी उपाध्यक्ष, पुणे जिल्हा बार असोसिएशन

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×