सलग तिसऱ्या आठवड्यांत निर्देशांकांत घसरण

रिलायन्स इंडस्ट्रीजला 1 लाख कोटी रुपयांचा बसला फटका

मुंबई – गेल्या आठवड्यात शेअरबाजार निर्देशांकांत मोठी घट झाली. गेल्या तीन आठवड्यांपासून शेअरबाजार निर्देशांक कोसळत आहेत. सरलेल्या आठवड्यातील घसरण सात महिन्यांत सर्वांत मोठी होती.

भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. सर्वच राजकीय पक्ष परस्परावर बेफाम आरोप करीत आहेत. सध्याच्या निवडणुकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने लाट कमी आहे. त्यामुळे आगामी लोकसभा त्रिशंकू होते की काय अशी शंका गुंतवणूकदारांना येत आहे. त्यातच अमेरिकेने चीनवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावले आहे. भारतातील काही कंपन्यांनी सुमार ताळेबंद जाहीर केले आहेत. या कारणामुळे भारतीय बाजारात सरलेल्या आठवड्यात कमालीचे नकारात्मक वातावरण राहिले.

त्यामुळे या आठवड्यात मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 3.9 टक्‍क्‍यांनी कोसळून 37,462 वर आला आहे. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 3.7 टक्‍क्‍यांनी कोसळून 11,278 अंकांवर आला आहे. गेल्या आठ दिवसांपासून सलग निर्देशांकांत घसरण होत गेली. या आठवड्यात 11 क्षेत्रापैकी केवळ सहा क्षेत्राच्या निर्देशांकांत थोडीफार वाढ होऊ शकली.

गुंतवणूकदारांचे 3.22 लाख कोटी रुपयांचे नुकसान

देशातील आणि परदेशातील कारणामुळे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्ट गेल्या सात दिवसांत 3.2 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. त्यामुळे या निर्देशांकांशी संबंधित 50 कंपन्यांत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराचे सात दिवसांत 3.22 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

ही घसरण कधी थांबणार याबाबत शेअरबाजारात मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. काहींनी सांगितले की निवडणुकांच्या निकालानंतर परिस्थिती थोडीफार स्थिर होण्याची शक्‍यता आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे नुकसान

इतर कंपन्यांच्या शेअरबरोबरच भारतातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअरच्या भावात ही गेल्या सात दिवसांपासून घसरण होत आहे. या सात दिवसांत या कंपनीच्या शेअरचा भाव तब्बल 11 टक्‍क्‍यांनी कमी झाल्यामुळे या कंपनीचे भांडवली मूल्य एक लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

त्यामुळे आता शेअरबाजारावर रिलायन्स एक क्रमांकावरून दोन क्रमांकावर गेली आहे. तर टीसीएस ही कंपनी पहिल्या क्रमांकावर आली आहे. मॉर्गन स्टॅनली या संस्थेने रिलायन्स कंपनीचे पतमानांकन कमी केल्यानंतर या कंपनीच्या शेअरची विक्री अधिक प्रमाणावर होत आहे. जागतिक अस्थिरतेमुळे परदेशी संस्था गुंतवणूकदारांनी गेल्या तीन दिवसांत भारतीय शेअरबाजारातून 2500 कोटी रुपये काढून घेतले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.