हॅन्ड सॅनिटायझेशन मशीन पडून; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

येरवडा – करोना संसर्ग कमी करण्यासाठी नागरिकांना हात स्वच्छ धुण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव अनेक ठिकाणी हॅन्ड सॅनिटायझेशन मशीन बसवण्यात आले. परंतु, अशा अनेक मशीन महापालिकेच्या माजी महापौर स्व.भारत सावंत पाम उद्यानात काही दिवसांपासून पडून असल्याने करोनाचे गांभीर्य आरोग्य यंत्रणेला नाही का? असा प्रश्‍न नागरिक करू लागले आहेत.

ज्या नागरिकांना हात धुण्यासाठी हॅंडवॉश घेणे शक्‍य नव्हते त्यांच्यासाठी अशा मशीन चौका-चौकात बसविण्यात आली आहेत. येरवडा विश्रांतवाडी याठिकाणीही लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार मशीन देण्यातआले होते.

करोना काळात हात स्वच्छ धुण्यासाठी नागरिकांना याचा उपयोग व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या निधीतून या उपक्रमासाठी खर्च करण्यात येत आहे. एका मशीनचा खर्च 22 हजार 500 रुपये इतका आहे. मात्र, याचा उपयोग नागरिकांना होत नसून ठेकेदारांच्या बिलासाठी हा कारभार आहे काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात सहाय्यक आयुक्त विजय लांडगे यांना संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

पाणी, लिक्‍विड नाही…
शहर परिसरात अनेक ठिकाणी हॅन्ड सॅनिटायझर मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. मात्र, मशीनच्या टाक्‍यांमध्ये पाणी नसते तर काही ठिकाणी लिक्विड नसते. काही ठिकाणी तर नळकोंडाळे गायब आहेत. प्रादुर्भाव वाढत असतानाच या मशिन्स्‌ बंद पडलेल्या आहेत.

प्रभाग दोनच्या नगरसेविका शीतल सावंत यांच्या निधीतून हे हॅन्ड सॅनिटायझेशन मशीन नुकतेच तयार करण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी याची गरज आहे त्या ठिकाणी ते बसविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानंतर या मशीन बसविण्यात येतील.
– सपना सहारे, कनिष्ठ अभियंता, येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.