सोन्याच्या दारात घसरण; खरेदीकडे कल

दीर्घकाळात दरात मोठी वाढ होण्याची शक्‍यता

पिंपरी – काही महिन्यांपूर्वी सोन्याने उच्चांकी दर गाठला होता. परंतु आता सोन्याचे दर घसरुन 50 हजारांच्या खाली पोहोचले आहेत. त्यातच लग्नसराई असल्याने पुन्हा एकदा नागरिकांचा सोने खरेदीकडे कल वाढत असलेला दिसत आहे. शिवाय लवकरच सोने पुन्हा 50 हजारांच्या पुढे जाण्याची शक्‍यता सराफा क्षेत्रातील काही तज्ज्ञ व्यक्‍त करत असल्याने सध्या सोने खरेदीसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे मानले जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थिरता निर्माण झाल्यानंतर या दरामध्ये वाढ होऊ शकते. सोन्याच्या दरामध्ये दीर्घकाळात भरीव वाढ शक्‍य आहे, असे मत सराफ व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे प्रति दहा ग्रॅमचे दर 49 हजार 200 रुपयांपर्यंत पोहचले होते.

तर, 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 47 हजार 200 रुपये इतके होते. तर, चांदीचा भाव प्रति किलो 65 हजार रुपये इतका होता. डिसेंबर महिन्यात 24 कॅरेट सोन्याचे दर 51 हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहचले होते. त्यामध्ये जवळपास पावणेदोन हजारांपेक्षा आधिक घट झाली आहे.

चांदीचा दर डिसेंबर महिन्यात प्रति किलो 68 हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहचला होता. त्यामध्ये सध्या तीन हजार रुपयांनी घट झाली आहे. तथापि, करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आणि लसीकरणाला सुरूवात झाल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थिरता निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात योग्य स्थिरता आल्यानंतर सोन्याच्या दरांमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात आहे.

लग्नसराईमुळे वाढली मागणी
लग्नसराईमुळे टेंपल ज्वेलरीला चांगली मागणी आहे. त्याशिवाय, चांदीमध्ये पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याला मागणी आहे. सोन्याचे दर उतरले असताना बऱ्याच जणांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करून ठेवली आहे. गुंतवणूकदार आता सोन्याच्या दरात वाढ होण्याची वाट पाहत आहेत. पुढील काही महिने लग्नसराईचे असल्याने सोन्याच्या विविध दागिन्यांची खरेदी सुरू झाली आहे. त्याशिवाय, बचत आणि गुंतवूणक म्हणून 24 कॅरेटमधील वेढणी, कॉइन यांनाही चांगली मागणी आहे.

24 कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमला 50 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थिरता निर्माण झाल्यानंतर सोन्याच्या दरामध्ये वाढ होईल. दीर्घकाळात सहा महिने ते वर्षभराच्या कालावधीत सोन्याचे दरामध्ये भरीव वाढ अपेक्षित आहे. सध्या लग्नसराईमुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. त्याशिवाय, गुंतवणूकदारांचा ओढा सोन्यामधील गुंतवणुकीकडे वाढला आहे.
– दिलीप सोनिगरा, मालक, दिलीप सोनिगरा ज्वेलर्स

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.