नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमणसिंग, पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी अखील भारतीय कॉंग्रेस समितीच्या संशोधन विभागाचे बनवाट लेटरहेड बनवून त्यावर चुकीचा आणि बदनामीकारक मजकूर प्रिंट केल्याच्या कथित मुद्द्यावरून छत्तीसगढमध्ये एफआयआर नोंदवण्यात आली.
या दोघांना पुढील तपासासाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे, असे रायपूरच्या सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्याचे अंमलदार आर के. मिश्रा यांनी सांगितले. संबित पात्रा यांना प्रत्यक्ष अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा चौकशीत सहभागी होण्यास सांगितले आहे. छत्तिसगढ प्रदेश एनएसयुआयच्या अध्यक्षांनी याबाबतची फिर्याद नोंदवली आहे, असे मिश्रा यांनी सांगितल्याचे वृत्त एएनआय या वृत्त संस्थेने दिले आहे.
दरम्यान, कॉंग्रेसनेही दिल्ली पोलिसांत एक तक्रार दाखल केली. त्यात त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, संबित पात्रा आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्यावर या प्रकरणात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
करोनाच्या नव्या विषाणूला मोदी विषाणू अथवा भारतीय विषाणू असे संबोधत पंतप्रधान आणि देशाची बदनामी करण्यासाठी कॉग्रेस टूलकीटचा वापर करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला होता. तर आपल्याला बदनाम करण्यासाठी भाजपा बनावट टुलकीटचा अपप्रचार करत असल्याचा पलटवार कॉंग्रेसने केला होता.
एनएसयुआयचे अध्यक्ष आकाश शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात खोट्या बातम्या पसरवणे, दोन गटात वैमनस्य निर्माण करणे असे गुन्हे नोंदवण्यात अले आहेत. कॉग्रेसच्या या कथित टूलकिटला संबित पात्रा यांना टॅग केल आहे. त्या टॅगला केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती मंत्रालयाने आक्षेप नोंदवला. त्यानंतर हे टूलकीट बनावट असल्याचा शिक्का ट्विटरने मारला होता. त्यानंतर या वादाला तोंड फुटले.