महाळुंगे – खेड तहसिल कार्यालयात पुरवठा अधिकारी असल्याचे सांगत दुकानदारांकडून खंडणी उकळणाऱ्या दोघांना महाळुंगे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ज्ञानेश्वर त्रिंबक नेहे (वय 57, रा. सेक्टर नंबर4, प्राधिकरण मोशी) आणि संदीप नानासाहेब बोर्डे (वय35, रा. हनुमान हौसिंग सोसायटी, रुपीनगर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत पायगुडे यांचे महाळुंगे येथे ओम साई गॅस शेगडी रिपेअरिंगचे दुकान आहे. दोघे आरोपींनी पायगुडे यांच्या दुकानात येऊन “आम्ही खेड तहसिल कार्यालयातील पुरवठा अधिकारी आहोत, तुम्ही दुकानात गॅस सिलिंडर कसा काय ठेवला? तुमच्यावर कारवाई करू, कारवाई टाळायची असेल तर दहा हजार रुपये हप्ता चालू कर” असा दम दिला. पायगुडे यांना संशय आल्याने त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ दुकानात येऊन तोतया पुरवठा अधिकाऱ्याची तपासणी केली. त्यांचेकडे ओळखपत्र किंवा इतर कोणतेही पुरवठा अधिकारी असल्याचा पुरवा सापडला नाही. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दोघा खंडणीबहाद्दराविरूद्ध चाकण पोलिस ठाण्यात भा.द.वि. कलम 384, 385, 170, 34, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, उपर पोलिस आयुक्त डाॅ. संजय शिंदे, पोलिस उपायुक्त परिमंडळ 1 मंचक इप्पर, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आनंद भोईटे, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे पोलिस चौकीचे वरिष्ठ पेलिस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे दशरथ वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण, पोलीस हवालदार राजेंद्र कोणकेरी, अमोल बोराटे, ज्ञानेश्वर आटोळे, विठ्ठल वडेकर, तानाजी गाडे, किशोर सांगळे, युवराज बिराजदार, शिवाजी लोखंडे, शरद खैरे, श्रीधन इचके, यांनी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण करत आहेत.