न्हावरे (ता.शिरुर ) – येथील एका कापड दुकानात पोलीस असल्याचा बहाणा करून कापड दुकानदाराकडून दीड हजार रुपये व मोबाईल बळजबरीने घेऊन पसार झालेल्या तोतया पोलिसाला न्हावरे पोलिसांनी अटक केली आहे.
रमाकांत मारूती करपे (रा.गुनाट,ता.शिरूर,जि. पुणे) असे तोतया पोलीस म्हणून वावरत असलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. शिरूर पोलिसांनी तोतया पोलिसाविरुद्ध तोतयागिरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, न्हावरे येथील मंगेश सुभाष साबळे यांचे येथील राजे कॉम्प्लेक्स येथे कापड दुकान आहे. दरम्यान तोतया पोलीस रमाकांत करपे हा कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने साबळे यांच्या दुकानात आला. मी पोलीस आहे, असे करपे याने सांगितले. तसेच माझे सहकारी कापरे यांनी या दुकानात चांगले कपडे मिळतात असे मला सांगितले आहे. म्हणून मी तुझ्या दुकानात कपडे खरेदी करायला आलो आहे.
खरेदी नंतर कापड दुकानदार साबळे यांनी बिल मागितले असता, मला बिल मागतो ? मी तुझ्यावर गुन्हा दाखल करतो. तुच मला पाच हजार रुपये दे. अशी दमदाटी करून बळजबरीने दुकानदार साबळे यांंच्याकडून करपे दीड हजार रूपये व मोबाईल घेऊन पसार झाला.
मात्र, या घटनेची तक्रार कापड दुकानदार साबळे यांनी तात्काळ न्हावरे पोलीस दूरक्षेत्रात दाखल केल्याने सहायक पोलीस फौजदार संजय कोलते यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा रचून रमाकांत करपे या तोतयाला न्हावरे येथे पकडले. या घटनेचा पुढील तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.