मुंबई – मुंबईतील दहिसर येथे बुधवारी पोलिसांनी सात कोटी रुपये किंमतीच्या दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सातही आरोपींना न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोक दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन मुंबईत येणार आहेत अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने दहिसर येथे सापळा रचून आरोपी येत असलेल्या गाडीला थांबवून चौकशी केली. यावेळी गाडीत पाच कोटी रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. या सर्व नोटा दोन हजार रुपयांच्या होत्या. दोन हजार रुपयांच्या 25 हजार नोटा पोलिसांनी जप्त केल्या.
त्यानंतर गाडीमधील आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांचे काही साथीदार हॉटेल अम्फा येथे थांबले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकून तेथून दोन हजार रुपयांच्या तब्बल दहा हजार बनावट नोटा जप्त केल्या. या नोटांची किंमत दोन कोटी रुपये इतकी आहे. या नोटा नेमक्या आल्या कुठून? यामध्ये कुणाचा हात आहे? याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.